सिडकोतील महिलेच्या प्रसूतिप्रकरणाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:11 IST2020-09-07T20:52:17+5:302020-09-08T01:11:52+5:30
सिडको : सिडकोच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात दाखल न करता गर्भवती महिलेला तसेच पाठविल्याने रस्त्यातच प्रसूती झाल्याप्रकरणी महापालिकेने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला आहे.

सिडकोतील महिलेच्या प्रसूतिप्रकरणाची चौकशी
सिडको : सिडकोच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात दाखल न करता गर्भवती महिलेला तसेच पाठविल्याने रस्त्यातच प्रसूती झाल्याप्रकरणी महापालिकेने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला आहे. दरम्यान, ‘त्या’ महिलेवर दबाव आणून असे काही झालेच नाही असे वदवून घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांचा आटापिटा सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने याप्रकरणाचा तिढा अधिकच वाढला आहे. प्रसूतिकळा आलेल्या गरोदर महिलेला मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसूतीसाठी दाखल करून न घेता घरचा रस्ता दाखवला.
यामुळे पतीसोबत घरी पायी जात असताना गीता लोंढे भोवळ येऊन रस्त्यावर पडली असताना प्रभागाच्या महिला नगरसेवक भाग्यश्री ढोमसे यांनी तत्काळ परिसरातील महिलांच्या मदतीने लोंढे यांची रस्त्यावरच प्रसूती केली. हा प्रकार घडल्यानंतर बाळ व बाळतिणीला रु ग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, अशा आशयाची मागणी राजकिय पक्षांकडून केली जात आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला असे काही झालेच नसून या प्रकरणात डॉक्टरांची काहीच चुकी नाही असे वादवून घेण्यासाठी चक्क रुग्णालयात तिच्यावर दबाव आणत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे गुंता अधिकच वाढला असल्याचे दिसून येत आहे.