गटार कामाची लाचलुचपत विभागाकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 22:59 IST2021-10-13T22:58:59+5:302021-10-13T22:59:43+5:30
मालेगाव : शहरातील स्टेट बँक परिसर, साठ फुटी रोड परिसरात गटार न करताच ४९ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार जिल्ह्याच्या दक्षता गुण नियंत्रण मंडळ व लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत बुधवारी (दि.१३) सात सदस्यीय पथकाने येथील शासकीय विश्रामगृहावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करीत प्रत्यक्ष गटार कामाची पाहणी केली. याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.

मालेगावी गटार कामाची पाहणी करताना दक्षता गुण नियंत्रण मंडळाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार, उपअभियंता बोडके व लाचलुचपत विभागाचे कर्मचारी.
मालेगाव : शहरातील स्टेट बँक परिसर, साठ फुटी रोड परिसरात गटार न करताच ४९ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार जिल्ह्याच्या दक्षता गुण नियंत्रण मंडळ व लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत बुधवारी (दि.१३) सात सदस्यीय पथकाने येथील शासकीय विश्रामगृहावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करीत प्रत्यक्ष गटार कामाची पाहणी केली. याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.
स्टेट बँक, साठ फुटी रोड व सत्यम्, शिवम्, सुंदरम् अपार्टमेंट या तीन भागात गटार बांधण्यासाठी २०११ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. २७ जानेवारी २०१२ मध्ये मे. डी. वाय. शाह या ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला होता. मात्र ठेकेदाराने साठ फुटी रोड येथे गटार बांधली. पण निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत अर्धवट काम सोडून दिल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील यांनी लाचलुचपत व दक्षता गुण नियंत्रण मंडळाकडे केली होती. या प्रकरणाची गेल्या काही दिवसापासून चौकशी सुरू आहे. तर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला याच भागात नव्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ५० लाख रुपये खर्चाची भुयारी गटार, रस्ता काँक्रिटीकरणाचे काम करायचे आहे. यासाठी नगरविकास विभागाला एनओसी लागणार होती. मात्र यापूर्वीच या भागात गटार काम झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जुन्या गटार कामाची चौकशी करण्यासाठी दक्षता गुण नियंत्रण मंडळाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार, उपअभियंता बोडके यांच्यासह सहा सदस्यीय समितीने बुधवारी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यासाठी महापालिकेने आठ दिवसापूर्वी २ लाख ५८ हजार रुपये शासन शुल्क भरले आहे.
कागदपत्रेच गायब?
समितीने दिवसभर शासकीय विश्रामगृहावर कागदपत्रांची पडताळणी केली. मात्र, महापालिकेकडे कागदपत्रेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे समितीही हतबल झाली होती. प्रत्यक्षात गटारीच्या कामाची मोजणी करण्यात आली आहे. याचा अहवाल सादर केला जाणार आहे. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता कैलास बच्छाव, चौरे, गांगुर्डे, नगरविकास विभागाचे उपअभियंता संजय जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहुल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.