रुग्णवाहिका, उपचाराअभावी अर्भकाचा गर्भात मृत्यू, मृत्यूनंतरही अवहेलना; नाशिकमध्ये मातेवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 08:00 IST2025-06-14T07:59:40+5:302025-06-14T08:00:17+5:30

Mokhada News: एका गर्भवतीसाठी रुग्णवाहिका न आल्याने खासगी वाहनाने त्यांनी बुधवारी खोडाळा आरोग्य केंद्र गाठले. पण डॉक्टरांनी तीन तासांनंतर येथे उपचार शक्य नसल्याचे सांगून पुढील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने दोन तास रखडावे लागले आणि यादरम्यान अर्भकाचा गर्भात मृत्यू झाला.

Infant dies in the womb due to lack of ambulance and treatment, neglect even after death; Mother treated in Nashik | रुग्णवाहिका, उपचाराअभावी अर्भकाचा गर्भात मृत्यू, मृत्यूनंतरही अवहेलना; नाशिकमध्ये मातेवर उपचार

रुग्णवाहिका, उपचाराअभावी अर्भकाचा गर्भात मृत्यू, मृत्यूनंतरही अवहेलना; नाशिकमध्ये मातेवर उपचार

- रवींद्र साळवे
मोखाडा -  एका गर्भवतीसाठी रुग्णवाहिका न आल्याने खासगी वाहनाने त्यांनी बुधवारी खोडाळा आरोग्य केंद्र गाठले. पण डॉक्टरांनी तीन तासांनंतर येथे उपचार शक्य नसल्याचे सांगून पुढील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने दोन तास रखडावे लागले आणि यादरम्यान अर्भकाचा गर्भात मृत्यू झाला. असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयातून मृत अर्भकासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही आणि खासगी वाहनासाठी पैसे नव्हते, परिणामी त्या गर्भवतीच्या पतीने मृत अर्भक पिशवीत टाकून ८० किमीचा प्रवास एसटीने करून मोखाड्यातील आपले गाव गाठले अन् अंत्यविधी केला.

जोगलवाडी येथील अविता सखाराम कवर (२६) हिला १० जूनला पहाटे प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी १०८ वर कॉल केला; परंतु रुग्णवाहिका उपलब्ध झाली. नंतर ११ जूनला सकाळी आशा कार्यकर्तीने १०८ ला कॉल केला, मात्र तेव्हाही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी खासगी वाहनांतून गर्भवतीला नेऊन दुपारी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. यावेळी येथे उपचार करू, असे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितल्याचे अविता यांचे पती सखाराम यांनी ‘लोकमत’ला सांगितले. परंतु साडेतीन तासांनंतर येथे उपचार शक्य नसल्याचे सांगत साधारण सायंकाळी गर्भवतीला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास डॉक्टरांनी सांगितले. यादरम्यान खोडाळा केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आसे येथील उपकेंद्रातून रुग्णवाहिका मागविली. सायंकाळी मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यावर गर्भवतीच्या तपासणी दरम्यान बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. तेथील डाॅक्टरांना शस्त्रक्रिया करत मातेचा जीव वाचविला.

सुरुवातीपासूनच वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर वेळेत उपचार डॉक्टरांनी केले नाहीत. याबाबत जाब विचारल्याने पोलिसांना बोलावून मलाच मारहाण केली.  
- सखाराम कवर, गर्भवतीचा पती

दवाखान्यात दाखल केल्यानंतर बाळाचे ठोके होत नव्हते, म्हणून मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु रुग्णवाहिका नसल्याने ती आसे येथून मागविण्यात आली, यातदोन तासांचा वेळ वाया गेला. 
- अश्विनी मोरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खोडाळा 

कारवाईची मागणी
खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवतीला दाखल केल्यानंतर वेळेत उपचार केले जात नसल्याने गर्भवतीचा पती संतापला होता. मात्र डॉक्टरांनी पोलिसांना बोलावून त्या पतीला मारहाण केल्याचा आरोप तिचा पती सखाराम यांनी केला असून, मारहाण करणाऱ्या पोलिसांसह दोषी डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे.

Web Title: Infant dies in the womb due to lack of ambulance and treatment, neglect even after death; Mother treated in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.