मंगळवारी किमान तापमानाचा पारा ८.४ अंशावर होता; मात्र बुधवारी यामध्ये अधिक घसरण होऊन पारा आणखी खाली आला. ढगाळ हवामानामुळे चार दिवस दुर्लभ झालेले सूर्यदर्शन अन् हलक्या सरींचा रिमझिम वर्षाव अशा विचित्र वातावरणाचा काही दिवसांपूर्वी अनुभव घेतल्यानंतर आता रविवारपासून नाशिककरांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागत आहे. रविवारपासून किमान तापमानात होऊ लागलेली घसरण ही कायम आहे.
किमान तापमानाचा पारा या आठवड्यात वेगाने घसरण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविण्यात आली होती. उत्तरेकडील शीतलहरी राज्यात दाखल होऊ लागल्याने शहराच्या वातावरणात अचानक गारठा वाढू लागला आहे, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. ढगाळ स्थिती दूर झाल्यामुळे सध्या कोरडे वातावरण अनुभवयास येत आहे. अरबी समुद्रात मागील आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणातून थंडी गायब झाली होती. शहरात रविवारी सायंकाळपासून थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. नागरिक शेकोट्या व उबदार कपड्यांचा आधार घेत थंडीपासून बचाव करत आहेत.