नांदगाव : कर्जाची परतफेड मुदतीत न केल्याने तालुक्यातील सहकारी संस्थांच्या १९० संचालकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी प्रशासन सरसावले असून, कर्ज भरले नाही तर कोणत्या पुढारी थकबाकीदार संचालकावर कारवाईची कुºहाड कोसळणार याची खमंग चर्चा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वर्तुळात सुरू झाली आहे. ही वार्ता कळाल्याने अनेक संस्थांच्या संचालकांचे धाबे दणाणले असून, परतफेडीच्या रकमांची जुळवणी सुरू झाल्याचे वृत्त आहे.मुदतीत घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकलेल्या या कर्जदार संचालकांमध्ये प्रतिष्ठित नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे. आता हे थकबाकीदार ठरलेले संचालक आपले कर्ज भरून आपले पद व प्रतिष्ठा कशी कायम ठेवतात याकडे लक्ष लागले आहे.अपात्रतेच्या या प्रकरणाला जिल्हा बँकेने अनुमती दर्शविल्याने सहकार खात्याचा कारवाईचा मार्ग मोकळा झालेला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, नांदगावच्या सहाय्यक निबंधकांनी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे थकबाकीदार असलेल्या संचालकांवर विहीत मुदतीत कर्जफेड न केल्यामुळे ते संबंधित संस्थेचे ते थकबाकीदार झाले असल्याचा अहवाल पाठवून अभिप्राय मागवला होता. जिल्हा बँकेने सहाय्यक निबंधकांच्या २४ जुलैच्या पत्राची दखल घेत कायदेशीर कार्यवाही करण्यास बँकेची हरकत असणार नाही, असे १ आॅगस्टच्या पत्रात सहाय्यक निबंधकांना कळविले आहे. यामुळे नांदगाव तालुक्यातील ५८ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या १९० संचालकांवर अपात्रतेच्या कारवाईचा बडगा उगारला गेला आहे.
१९० संचालकांवर अपात्रतेची कारवाई?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:00 IST