मराठीच्या माहेरघरात ग्रंथविक्रेतेच पोरके!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 10:10 IST2026-03-23T10:09:29+5:302026-03-23T10:10:29+5:30
नाशिक येथे नुकतेच विश्व मराठी साहित्य संमेलन झाले.

मराठीच्या माहेरघरात ग्रंथविक्रेतेच पोरके!
योगेश बिडवई, उप-वृत्तसंपादक
नाशिक येथे नुकतेच विश्व मराठी साहित्य संमेलन झाले. त्यात ठाण्यातील काही प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते यांना अल्प प्रतिसाद मिळाला. त्यांचा जाण्यायेण्याचा-राहण्याचा खर्चही निघाला नाही. छोट्या प्रकाशकांचे स्टॉल लांब असल्याने तेथपर्यंत वाचकच पोहोचले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे इतर इव्हेंटवरील खर्च कमी करून ग्रंथव्यवहार, साहित्यव्यवहारात महत्त्वाची भूमिका असलेल्या प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांना शासनाने कमी दरात स्टॉल द्यायला हवेत. इतर व्यवस्थेवरील खर्चही कसा कमी होईल, हे सांस्कृतिक कार्य विभाग व मराठी भाषा विभागाने पाहणे गरजेचे आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली ही ठाणे जिल्ह्यातील मराठी माणसाची माहेरघरे. येथे मराठी साहित्य, संस्कृती, नाटक, सिनेमावर प्रेम करणारा रसिक आहे. मात्र येथील प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत.
ठाणे जिल्ह्यात १२ हजार वाचनालये, प्रतिष्ठित ग्रंथालये आहेत. प्रतिथयश प्रकाशकांची संख्या १०च्या आसपास आहे. मात्र वितरणापासून त्यांच्या अनेक अडचणी आहेत. वाचनालयांची पुस्तक खरेदी हा प्रकाशकांच्या व्यवसायातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यावर शासनाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
ठाण्यातील ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे, कवी महेश केळुस्कर, लेखक प्रवीण दवणे यांच्या पुस्तकांना चांगला प्रतिसाद मिळतो, असे प्रकाशक सांगतात. मात्र वितरणात अडथळे येतात. महापालिकांनी पुस्तक विक्रेत्यांना अल्प दरात स्टॉल द्यावेत, असा जीआर शासनाने काढला होता. मात्र महापालिकांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही.
पुस्तके जगवू शकतात समाज, असे म्हटले जाते. मात्र ग्रंथव्यवहार सुलभ व्हावा, यासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे माणसाने कितीही भौतिक प्रगती केली तरी पुस्तकांविना तो ज्या जागेवर उभा आहे, ती भुसभुशीत होत जाते.
ग्रंथालयांना पुस्तके देण्याच्या योजनेचे काय?
ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना शासन पुस्तके विकत घेऊन ग्रंथालयांना द्यायचे. नंतर या योजनेला घरघर लागली, अशी खंत शारदा प्रकाशनाचे संतोष राणे यांनी व्यक्त केली. शाळेपासूनच वाचनाचे छोटे-छोटे उपक्रम सुरू करण्याची गरज आहे. महाविद्यालयीन स्तरावर पुस्तक वाचनाला वेगळे १० गुण देण्याची गरज आहे. ग्रंथालयांची स्थितीही फारशी चांगली नाही. त्यांचे अनुदान रखडते. ग्रंथपालांना वेळेवर वेतन मिळणार नसेल आणि ते तुटपुंजे असेल तर ग्रंथालयांना नवसंजीवनी कशी मिळणार? पायरेटेड पुस्तकांमुळेही व्यवसायावर गदा आली आहे. अभिनेत्री सुलोचना यांच्यावरील पुस्तकाचीही पायरेटेड प्रत बाजारात आली होती. त्यावर कारवाई करताना खूप श्रम घ्यावे लागले, असा प्रकाशक अमोल नाले यांचा अनुभव आहे.