कामगिरी सुधारा अन्यथा कारवाईला तयार राहा

By Admin | Updated: September 30, 2014 23:06 IST2014-09-30T23:05:49+5:302014-09-30T23:06:03+5:30

सीईओंचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना इशारा

Improve performance otherwise be prepared for action | कामगिरी सुधारा अन्यथा कारवाईला तयार राहा

कामगिरी सुधारा अन्यथा कारवाईला तयार राहा

नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, बागलाण, सुरगाणा, पेठ व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतील आरोग्यविषयक कामकाज उद्दिष्टापेक्षा अत्यंत निराशाजनक असून, महिनाभरात यात सुधारणा न झाल्यास आपण अशा तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिला.
सुखदेव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाच्या ‘कायापालट’ प्रकल्पासह एकूणच आरोग्यविषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मासिक बैठकीचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले होते. बैठकीत सुखदेव बनकर यांनी संस्थेअंतर्गत झालेल्या प्रसूतींचा आढावा घेतला असता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वात कमी २६ टक्केच प्रसूती संस्थेत झाल्याचे त्यांना आढळून आले. त्याचप्रमाणे मुलवड, साल्हेर, मुल्हेर यांसह अन्य संस्थांमध्येही हीच बाब आढळून आली.
संस्थेअंतर्गत प्रसूतीचे उद्दिष्ट ९० टक्के असताना, जेमतेम काम झाल्याचे आढळून आले. त्यावरून त्यांनी त्र्यंबकेश्वर, बागलाण, सुरगाणा व पेठ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना तंबी दिली. हीच बाब संस्थेअंतर्गत कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, बाह्णरुग्ण विभागातील कमी रुग्ण यांसह विविध बाबींमध्ये जयदर, चिखलओहोळ, कपालेश्वर, साल्हेर, मुल्हेर, मुलवड, शिरसगाव, भुुवन, अंबासन, ब्राह्मणगाव, अलियाबाद, वीरगाव यांसह अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामकाज गंभीर स्वरूपात कमी असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना व त्या अनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कडक शब्दांत तंबी देत कामकाज सुधारा, उद्दिष्टानुसार कार्यवाही करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दमच सुखदेव बनकर यांनी भरला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Improve performance otherwise be prepared for action