IMA's Thousand Doctors Stampede | आयएमएचे दीड हजार डॉक्टर्स संपावर
आयएमएचे दीड हजार डॉक्टर्स संपावर

नाशिक : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिक आयएमएचे सुमारे दीड हजार डॉक्टर्स सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळून पुकारण्यात आलेल्या या संपामुळे रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागातील कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्याचा कायदा करण्याबाबत आयएमए येथे झालेल्या चर्चेत डॉक्टरांनी अनेक प्रस्ताव सादर केले.
पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या हल्ल्याच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासंदर्भात केंद्राने कायदा करावा, अशी मागणी घेऊन आयएमएने देशभर संपाची हाक दिली आणि सर्वत्र संप सुरू झाला. या संपात नाशिक आयएमएनेदेखील सहभाग घेत सकाळी ६ वाजेपासून शहरातील आपत्कालीन सेवा सुरू ठेवून संपाला सुरुवात करण्यात आली. या संपात शहरातील जवळपास ५०० रुग्णालयांमधील आयएमएचे डॉक्टर्स सहभागी झाले होते. आयएमएला डेंटल आणि फिजिओ थेरपी डॉक्टरांनीदेखील पाठिंबा दर्शवित संपात सहभाग नोंदविला तर इतर पॅथींच्या डॉक्टरांनी, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टर्स यांनीदेखील पाठिंबा दर्शविला, अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे यांनी दिली.
सकाळपासून सुरू झालेल्या या संपामुळे जिल्हा रुग्णालयासह अन्य रुग्णालयातील सर्व प्रकारच्या ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) बंद होते. त्यामुळे रुग्णांची तपासणी होऊ शकली नाही. आयएमए येथे जमलेल्या डॉक्टरांनी एकत्र येत डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायदा झाला पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. यावेळी झालेल्या चर्चेत कायद्यामध्ये सुरक्षिततेसाठी कोणत्या तरतुदी असाव्यात याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले. अनेकांनी यासंदर्भातील नियमावलीत काय असले पाहिजे ते सुचविले.
मनपा डॉक्टर्सचा काळ्या फिती लावून पाठिंबा
महापालिका तसेच शासनाच्या तत्सम सेवेत असलेल्या डॉक्टरांनी प्रत्यक्ष संपात सहभाग घेतला नसला तरी त्यांनी काळ्या फिती लावून सोमवारी कामकाज केले. थेट संपात सहभागी होऊ शकत नसल्यामुळे या डॉक्टरांनी मात्र डॉक्टरांवरील संरक्षणाच्या कायद्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात आंदोलन केले.
लॅबमधील कामकाजही बंद
४आयएमएने पुकारलेल्या संपात बाह्यरुग्ण विभागाबरोबरच लॅब टेक्निशियन्सची सर्व कामे बंद ठेवण्यात आली होती. सिटीस्कॅन, एक्सरे सेंटर्स बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे डॉक्टर्स जरी वॉर्डात येऊ शकले नसले तरी रुग्णांचे रिपोर्ट्स आणि लॅबची सर्व कामे रखडली होती.


Web Title:  IMA's Thousand Doctors Stampede
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.