१२४ झाडांची बेकायदेशीर कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:13 IST2018-04-03T01:12:56+5:302018-04-03T01:13:30+5:30
आगर टाकळी रोडवरील जुन्नरे मळ्यातील जागा मालकाने १२४ झाडे बेकायदेशीररीत्या तोडल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदाराने मजुरांच्या मदतीने गेल्या शुक्रवारपासून त्या ठिकाणच्या झाडांची कत्तल करण्यास सुरुवात केली होती. तोडलेल्या झाडांचे ओंडके ट्रकमधून वाहून नेण्यात येत होते.

१२४ झाडांची बेकायदेशीर कत्तल
नाशिकरोड : आगर टाकळी रोडवरील जुन्नरे मळ्यातील जागा मालकाने १२४ झाडे बेकायदेशीररीत्या तोडल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदाराने मजुरांच्या मदतीने गेल्या शुक्रवारपासून त्या ठिकाणच्या झाडांची कत्तल करण्यास सुरुवात केली होती. तोडलेल्या झाडांचे ओंडके ट्रकमधून वाहून नेण्यात येत होते. सदर बाब पर्यावरणप्रेमी भारती जाधव, संदीप जाधव यांना समजताच त्यांनी रविवारी सकाळी जुन्नरे मळा येथे वृक्षतोड होत असलेल्या जागेवर धाव घेतली. उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते, दुय्यम पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस कर्मचारी व मनपा उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांनी त्या ठिकाणी येऊन पंचनामा केला. यावेळी संबंधित जागा मालकाने त्या जागेवर शेती करण्यासाठी झाडे तोडल्याचा दावा केला. याप्रकरणी मनपा उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांनी सोमवारी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जागामालक सुरेश श्रीधर जुन्नरे रा. आदित्यकुंज सोसायटी, पंचवटी व वृक्षतोडीचा ठेका घेतलेले अरुण विठोबा महाले रा. मखमलाबाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.