पालिकेचे दुर्लक्ष : सफाई कामगारांचे नियोजन नसल्याने फटका कचºयाचे ढीग कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:15 IST2018-03-04T00:15:19+5:302018-03-04T00:15:19+5:30
नाशिक : आरोग्य विभागाने सफाई कामगारांच्या केलेल्या बदल्या आणि पहाटे बंधनकारक केलेली सेल्फी हजेरी यामुळे सफाई कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे.

पालिकेचे दुर्लक्ष : सफाई कामगारांचे नियोजन नसल्याने फटका कचºयाचे ढीग कायम
नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाने सफाई कामगारांच्या केलेल्या बदल्या आणि पहाटे पाच वाजता हजेरीशेडवर बंधनकारक केलेली सेल्फी हजेरी यामुळे सफाई कामगारांमध्ये असंतोष पसरला असून, त्याचा प्रत्यय शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचºयाच्या ढिगांच्या माध्यमातून दिसून येत आहे. सफाई कामगारांच्या बदल्या करताना नियोजन न केल्याने साफसफाईची समस्या निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार, आरोग्य विभागाने ४७८ सफाई कामगारांच्या बदल्या केल्या आहेत. नाशिक पूर्व, पश्चिम आणि नाशिकरोड विभागातील सफाई कामगारांच्या बदल्या सिडको, सातपूर आणि पंचवटी विभागात करण्यात आल्या आहेत. मात्र, या बदल्या गैरसोयीच्या असल्याचा आरोप सफाई कामगारांच्या संघटनांनी केला आहे तर नियोजन करून बदल्यांबाबत पुनर्विचार करण्याची मागणीही संघटनांनी केली आहे. त्यातच, आयुक्तांच्याच आदेशान्वये हजेरी शेडवर प्रत्येक सफाई कामगाराला सेल्फी हजेरी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्याबाबतही सफाई कामगारांमध्ये रोष आहे. सफाई कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण असतानाच शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची साफसफाई न झाल्याने कचरा आहे तेथेच पडून आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही तक्रारी वाढल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असून, तक्रारींचीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.