पतीचा निर्घृण खून करून बायको पसार; नाशिकमध्ये घडली घटना, दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा
By अझहर शेख | Updated: September 24, 2022 22:04 IST2022-09-24T22:03:22+5:302022-09-24T22:04:44+5:30
त्याचा मृतदेह पोलिसांना घरातून कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

पतीचा निर्घृण खून करून बायको पसार; नाशिकमध्ये घडली घटना, दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा
नाशिक: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळागावातील माळी गल्ली- कोळीवाडा रस्त्यावर एका खोलीत राहणाऱ्या दाम्पत्यामध्ये झालेल्या वादातून पत्नीने आपल्या पतीचा निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.२४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दिलीप रंगनाथ कदम (५४) असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून त्याचा मृतदेह पोलिसांना घरातून कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
इंदिरानगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वडाळागावातील माळी गल्ली- कोळीवाडा रस्त्यावर एका खोलीत भाडेतत्वावर कदम दाम्पत्य राहत होते. कदम हे दहीपूल येथे दुचाकींची दुरूस्ती करत आपला उदरनिर्वाह चालवित होते. त्यांनी दुसरे लग्न केल्यामुळे मुलगादेखील त्यांच्यापासून मागील काही महिन्यांपासून वेगळा राहत होता. ते आपल्या पत्नीसमवेत वडाळागावात वास्तव्यास होते. मागील दोन दिवसांपासून भाऊ भेटला नाही, म्हणून त्यांच्या भावाने शनिवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घर गाठले. यावेळी मुलगा रोशन हादेखील तेथे आला.
दरवाजाला कुलुप असल्याने काका-पुतण्यांनी मिळून कुलुप तोडले असता घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली. दिलीप कदम हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेले आढळले. यावेळी त्यांनी इंदिरानगर पोलिसांना माहिती कळविली. माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा करत मृतदेह त्वरित जिल्हा शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी कदम यांचा मुलगा रोशन याच्या फिर्यादीवरून रात्री उशीरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.