Hundred crore turnover stalled | शंभर कोटींची उलाढाल ठप्प

शंभर कोटींची उलाढाल ठप्प

ठळक मुद्देतिढा सुटेना : सलग तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील कांदा लिलाव बंदच

लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख १५ कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये लिलाव तीन दिवसांपासून बंद आहेत. लिलाव बंद असल्यानं तीन दिवसांत ८० ते १०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
दीपावली सणाच्या खरेदीकरिता हा कालावधी कांदा अगर शेतमाल विक्रीकरिता महत्त्वाचा असतो. नेमके त्याचवेळी लिलावात कामकाज होत नाही. कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्याने कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद आहेत. त्यामुळे कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे, तर जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहे. ही अघोषित कांदा लिलाव बंदी जास्त दिवस राहिल्यास कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशांतर्गत पुन्हा किरकोळ बाजारात कांद्याच्या बाजारभावात भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होणे गरजेचे असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ जयदत्त होळकर यांनी व्यक्त केले आहे.

केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांकडून होणारी ७५ टक्के कांदा खरेदी बंद झाली आहे. केंद्र सरकारकडून २५ टन कांदा साठवणुकीची मर्यादा टाकण्यात आली आहे. अधिक कांदा असलेले व्यापारी लिलावात सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे अनेक बाजारांमध्ये कांद्याचे दर घसरल्याचं चित्र आहे.

Web Title: Hundred crore turnover stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.