चांदशीला रंगलेली हुक्का पार्टी उधळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 00:41 IST2021-12-27T00:40:42+5:302021-12-27T00:41:11+5:30
नववर्ष सेलिब्रेशनचा बेत आखण्यास सुरुवात झाली आहे. शहराजवळच्या खेड्यांमध्ये असलेल्या निर्जन भागातील हॉटेल, रेस्टॉरंट, बारमध्ये पार्ट्यांचे बेतदेखील केले जात आहे, अशाच एक विनापरवाना चांदशी शिवारात सुरू असलेली ‘हुक्का पार्टी’ उपमहानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर-पाटील यांच्या पथकाने उधळली.

चांदशीला रंगलेली हुक्का पार्टी उधळली
नाशिक : नववर्ष सेलिब्रेशनचा बेत आखण्यास सुरुवात झाली आहे. शहराजवळच्या खेड्यांमध्ये असलेल्या निर्जन भागातील हॉटेल, रेस्टॉरंट, बारमध्ये पार्ट्यांचे बेतदेखील केले जात आहे, अशाच एक विनापरवाना चांदशी शिवारात सुरू असलेली ‘हुक्का पार्टी’ उपमहानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर-पाटील यांच्या पथकाने उधळली. शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदशी गावाच्या शिवारात असलेल्या मुंगसरे रस्त्यावर ‘शॅक मल्टी क्युझिन बार’ हे बांबूपासून उभारलेले रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी ओल्या पार्ट्यांचा बेत दरवर्षी पहावयास मिळतो. शनिवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास या बारमध्ये विनापरवाना मोठ्या स्वरूपात हुक्का पार्टी होत असल्याची गोपनीय माहिती शेखर-पाटील यांच्या विशेष पथकाला मिळाली. पथकाने तालुका पोलिसांच्या पथकाला सोबत घेत संयुक्तरीत्या या बारवर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी सुमारे २४ युवक-युवतींकडून सर्रासपणे मद्यप्राशनासह हुक्क्याचा धूर सोडला जात असल्याचे आढळून आले. बारचा मालक संशयित शिवराज नितीन वावरे (२७, रा. गंगापूर रोड), रोखपाल विकास विजय उबाळे (२५ रा. बुलडाणा), रमाकांत नाथ केशव नाथ (३६, मूळ रा, ओडिसा) यांच्यासह हुक्का पॉट भरून टेबलवर ग्राहकांना पुरविणारे गोविंद रामचंद्र मलिक (२१, मूळ रा. ओडिसा), अक्षय चौधरी (२०) यांच्यासह हुक्का ओढणाऱ्या २४ युवा ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध सिगारेट व तंबाखू उत्पादने अधिनियमसह कलम-१८८च्या उल्लंघनप्रकणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. --इन्फो--
हुक्का तंबाखूचे १८डब्बे जप्त
पोलिसांनी या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात हुक्का ओढण्याच्या १७पॉटसह तंबाखूचे १८ डब्बे जप्त केले आहेत. तसेच चार हजार ३५० रुपयांची रोख रक्कमदेखील हस्तगत केली असून एकूण ३६ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर आपापल्या जिल्ह्यात नाशिक परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आल्याचे शेखर पाटील यांनी सांगितले.
---कोट--
प्रतिबंधित असलेल्या हुक्का तंबाखूचे सेवन या हॉटेलमध्ये करण्यात येत होते. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही खबरदारी न घेता पूर्वपरवानगीशिवाय पार्टी आयोजित केली गेली होती. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केली. नाशिक परिक्षेत्रात कोठेही विनापरवाना ‘थर्टीफर्स्ट’चे सेलिब्रेशन आयोजित करू नये. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेत घरगुती पद्धतीने नववर्षाचे स्वागत करावे.
- डॉ. बी. जी. शेखर पाटील, उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र
---