होर्डिंग्ज ठेक्याचा वाद महापालिकेच्या कोर्टात!

By Suyog.joshi | Published: April 23, 2024 01:54 PM2024-04-23T13:54:31+5:302024-04-23T13:55:14+5:30

खुल्या जागांवर जाहिरात होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेने १६ डिसेंबर २०१९ ला निविदा काढली. 

Hoardings contract dispute in the municipal court! | होर्डिंग्ज ठेक्याचा वाद महापालिकेच्या कोर्टात!

होर्डिंग्ज ठेक्याचा वाद महापालिकेच्या कोर्टात!

नाशिक  : महापालिकेतील अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणाचा चेंडू न्यायालयाने आता महापालिकेच्या कोर्टात टोलवला असून, कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात गेलेल्या ठेकेदाराला मोठा दिलासा मिळाला असून, मनपाने ठेकेदारावर कारवाईपूर्वी भूमिका मांडण्याची संधी द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा निवाडा आयुक्तांमार्फत करावा अशा सूचना देत न्यायालयाने या प्रकरणी कारवाईचा चेंडू महापालिकेच्या कोर्टात टोलवला आहे. खुल्या जागांवर जाहिरात होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेने १६ डिसेंबर २०१९ ला निविदा काढली. 

जाहिरात व परवाने विभागातील कर्मचाऱ्यांनी करारातील अटी व शहर बदलून संगनमताने होर्डिंग्ज घोटाळा केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझेशन वेल्फेअर असोसिएशनने केला होता. होर्डिंग्ज ठेकेदाराला २८ ठिकाणी जाहिरात फलक उभारण्याची परवानगी दिली. मात्र, ठेकेदाराने ६३ ठिकाणी जाहिरात फलक उभारले. यातून करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. शहरातील २८ जागा वगळता इतर २६ जागांवर लावलेले बेकायदा होर्डिंग्ज पंधरा दिवसांत हटविण्याच्या अल्टिमेटम मनपा करसंकलन विभागाने ठेकेदाराला दिला होता. त्यामुळे ठेकेदाराचे धाबे दणाणले. १५ ठिकाणी महापालिकेची परवानगी घेण्यात आली, तर ११ ठिकाणी परवानगी मिळण्यापूर्वी होर्डिंग लावण्यात आले. 

फक्त परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आले. मात्र, मनपाची परवानगी गृहीत धरत ठेकेदाराने जाहिरात फलक उभारल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मनपा करसंकलन व जाहिरात परवाने विभाग हे फलक काढत आर्थिक दंड वसूल करणार होता. परंतु त्या विरोधात ठेकेदार न्यायालयात गेला. त्यामुळे या प्रकरणात निर्णयाकडे लक्ष लागून होते. न्यायालयाने ठेकेदाराला त्याची बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई कशी असा प्रश्न उपस्थित केला. ठेकेदाराला त्याची भूमिका मांडण्यासाठी वेळ द्यावा, अशा सूचना मनपा प्रशासनाला दिल्या. तसेच या प्रकरणात मनपा आयुक्तांनी निर्णय घ्यावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

महापालिकेने अनधिकृत उभारलेले होर्डिंग्ज काढावे यासाठी ठेकेदाराला अल्टिमेटम दिला होता. परंतु, कारवाईच्या भीतीपोटी ठेकेदार न्यायालयात गेला व कारवाईला स्थगिती आणली. न्यायालयाने ठेकेदारास मनपासमोर त्याची बाजू मांडण्यास संधी द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.
- विवेक भदाणे, उपायुक्त, करसंकलन व जाहिरात परवाने विभाग (प्र.) मनपा

Web Title: Hoardings contract dispute in the municipal court!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक