दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीने घडविला इतिहास
By Admin | Updated: February 1, 2017 00:39 IST2017-02-01T00:39:18+5:302017-02-01T00:39:34+5:30
दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीने घडविला इतिहास

दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीने घडविला इतिहास
इतिहास चाळताना
नाशिकमध्ये महापालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी वातावरण तापल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये उत्साह संचारला. पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे इच्छुकांना घुमारे फुटले. या निवडणुकीत महापालिकेचे ८७ प्रभाग (वॉर्ड) झाले होते. म्हणजे दोन प्रभाग वाढले होते. महापालिकेचे आकर्षण वाढल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी काहीही करण्याची तयारी दर्शविली. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस हा प्रमुख पक्ष असला तरी देशात आणि राज्यात भाजपा सेनेची सत्ता आली होती. त्याचा एकूणच नाशिकच्या राजकारणावर परिणाम झाला. पहिल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती नव्हती. भाजपाच्या दहा तर शिवसेनेच्या अवघ्या नऊ जागा होत्या. परंतु नंतर वातावरण बदलले होते. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती झाली. अनुकूल वातावरण त्यामुळे अधिकच पथ्यावर पडले आणि नाशिक महापालिकेत शिवसेना- भाजपाचे ४४ नगरसेवक निवडून आले. कॉँग्रेसला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत अनेक खांदेपालट आणि धक्कादायक पराभव- विजय झाले. नाशिकचे प्रथम महापौर शांतारामबापू वावरे यांचा पराभव हा सर्वाधिक धक्कादायक होता. प्रभाग क्रमांक ८३ मध्ये वावरे यांचा पराभव केला तो त्यांचे शागिर्द असलेले हरीभाऊ लोणारी यांनी. ४९८ मतांनी म्हणजे अल्प मतांनी हा धक्का होता. लोणारी यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. लोणारी हे जायंट किलर ठरले. भाजपाचे ज्येष्ठ बंडोपंत जोशी यांचा प्रभाव क्षेत्र असलेला भागच अन्य भागाला जोडला गेल्याने ते निवडून येऊ शकले नाही. माजी महापौर पंडितराव खैरे यांनी निवडणूक न लढविता, त्यांचे कनिष्ठ बंधू शाहू खैरे यांना निवडून आणले. महापालिकेच्या सेवेत असलेले शाहू खैरे यांनी सेवेचा राजीनामा देऊन निवडणूक लढविली.
- संजय पाठक