ऐतिहासिक भाजी मार्केटची दुरवस्था
By Admin | Updated: June 29, 2017 00:25 IST2017-06-29T00:25:31+5:302017-06-29T00:25:49+5:30
येवला : पालिकेने तयार केलेल्या मार्केटऐवजी बाहेर रस्त्यावर भाजी विक्रेते बसत असल्यामुळे रस्त्यावरच बाजार थाटला जात आहे.

ऐतिहासिक भाजी मार्केटची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : पालिकेने तयार केलेल्या मार्केटऐवजी बाहेर रस्त्यावर भाजी विक्रेते बसत असल्यामुळे रस्त्यावरच बाजार थाटला जात आहे. यामुळे येथील शनिमंदिराजवळ कायम वाहतुकीची कोंडी होत आहे. यातून अनेकवेळा वाहनचालक व नागरिकांत बाचाबाची व भांडणासारखे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी नगरपालिकेने मोठा खर्च करून या भागाचे काँक्रिटीकरण केले आहे. पण त्याचा सदुपयोग होत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्यावर भरणारा भाजीबाजार केशवराव पटेल मार्केटमध्ये स्थलांतरित करावा, जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच शनि पटांगणाचे महत्त्वसुद्धा टिकून राहील, अशी मागणी येवलेकरांकडून केली जात आहे. शनि पटांगणावर अतिक्रमण करून मनमानी पद्धतीने भाजीविके्रते आपली दुकाने थाटत आहेत. मालक एक दुकाने चार अशी परिस्थिती आहे. बाहेर रस्त्यावर अनेक भाजीविके्रत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येथे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मध्यवस्तीत भाजीपाला मार्केट असावे तसेच गावाच्या संस्कृतीसंवर्धनासाठी मोठे सभागृह असावे या हेतूने येवला पालिकेने मोठा खर्च करून स्वर्गीय केशवराव पटेल भाजी मार्केट बांधले आहे. मात्र ते वापराविना पडून आहे. अवघा भाजीबाजार शनि पटांगणावर येऊन मोजके ५ ते ७ भाजीपालाविक्रे ते येथे बसतात. मार्केटची उर्वरित जागा मोकाट जनावरांचे आरामाचे ठिकाण झाले आहे. तसेच गांजा ओढणारे व इतर नशेखोरांची येथे वर्दळ दिसून येते. याबाबत पालिका काही कार्यवाही करील काय? या मार्केटमध्ये पुन्हा भाजीपाला विक्र ी सुरू होऊन गतवैभव प्राप्त करून देईल काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
येवला शहरात भाजीबाजारासाठी स्वर्गीय केशवराव पटेल मार्केटची बांधणी तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय प्रभाकरदादा कासार यांच्या काळात झाली. महाराष्ट्रात नंबर एकचे मार्केट तयार होऊन शहराला एक नवे वैभव प्राप्त झाले होते. मात्र ते वैभव फार काळ टिकले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात भाजी मार्केटची व्यवस्था असतानाही शनि पटांगण परिसरातच मोठ्या प्रमाणावर भाजीबाजार भरत आहे. यामुळे ऐतिहासिक शनिपटांगणाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. रात्री साडेआठ वाजेपर्यंत येथे भाजीबाजार भरतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा या पटांगणावर झाल्या आहेत. शहरात सभेसाठी एवढेच एक मैदान शिल्लक आहे. भाजीबाजार झालेल्या या ऐतिहासिक शनि पटांगणाला आता मोकळा श्वासदेखील घेता येत नाही ही सध्यस्थिती आहे. यासाठी या मार्केटमध्ये, स्वच्छता करणे, रंगरंगोटी करणे आणि भाजीपाला विक्रेत्यांना सक्तीने मार्केटमध्येच भाजीपाला विक्रीसाठी बसवणे या गोष्टी करणे पालिकेला इच्छा असली तर सहज शक्य आहे. या मार्केटच्या वरच्या बाजूला मोठे सभागृह आहे. परंतु त्याचा वापर होत नाही.
१ मार्केटमध्ये विक्रेत्यांसाठी मोठे ओटे व माल ठेवण्यासाठी जागा बांधून देण्यात आली आहे. परंतु हे मार्केट वापराविना पडून आहे. अनेक भाजीपाला व्यापारी थेट शनि पटांगण गाठत आहे. पटांगणावर सायंकाळी उशिरापर्यंत बाजार भरलेला असतो. भाजी मार्केटच्या जागा भाडे वसुलीचा ठेका पालिकेने खासगी ठेकेदाराला दिला आहे. भाजीपाला विक्रेत्या-कडून वसुली केली जाते. परंतु त्यांनी नेमके कुठे, कसे बसावे? याला काहीच बंधने नाहीत. येथे भाजीपाला घेण्यासाठी आलेला ग्राहक रस्त्यावर गाडी लावून भाजीपाला खरेदी करतो. परंतु त्याच्या या वागण्याने वाहतुकीचा खोळंबा येथे निर्माण होतो. सध्या सर्व्हे नंबर ३८०७ आणि ३८०८ मध्ये पालिकेचे मोठे काम चालू आहे. यामुळे लक्कडकोट देवीमार्गे शहरातील वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहतुकीचा सारा भार याच रस्त्यावर येतो.
२ मंगळवारी भरणारा बाजार आता शहराला विळखा घालतो. कारण बुरु ड गल्लीपर्यंत भरणारा बाजार आता डी.जी.रोडपर्यंत पोहचला होता. तसेच शिंपी गल्लीपर्यंत भरणार बाजार आता पटणी गल्लीपर्यंत भरायला सुरु वात झाली होती. परंतु जागृत नागरिक अॅड.हाबडे यांनी न्यायालयीन लढाई लढून ही समस्या दूर केली.