अझहर शेख ल्ल नाशिक हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्योग काही माथेफिरू समाजकंटकांकडून केले जात असतानाच, जुने नाशिकमधील बागवानपुरा परिसरात हिंदू-मुस्लीम बांधवांनी भावनिक नाते जपत ‘हम’ साथ-साथ असल्याचा संदेश देत समाजकंटकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. येथील एका रहिवासी हिंदू वृद्धेचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी चक्क मदरशामध्ये ठेवण्यात आले होते. मदरशामध्ये काहीकाळ मृतदेह ठेवण्याची परवानगी देत मुस्लीम युवकांनीही मानवतावादी दृष्टिकोन जपला आहे. बागवानपुरा येथील बडी मशिदीच्या मागील भिंतीला लागून मदरसा (अरबी शाळा) आहे. या परिसरात गेल्या ७० ते ८० वर्षांपासून हिंदू धर्मीय लांडगे कुटुंबीय वास्तव्यास आहे. या कुटुंबातील मंदाबाई उत्तम लांडगे (६७) यांचे आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास निधन झाले. निधनाची घटना समजताच नातेवाईकांची गर्दी होऊ लागली. अरुंद गल्ली, त्यातच घरही अगदी लहान असल्याने जागा कमी पडत होती. ही बाब लक्षात येताच बागवानपुरा मुस्लीम युवक मित्रमंडळाने मंदाबाई यांचे पार्थीव येथील सय्यद अमिनीया मदरशामध्ये ठेवण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पार्थीव अंत्यदर्शनासाठी मदरशामध्ये ठेवण्यात आले. मदरशात पुरेशी जागा, विद्युत व्यवस्था, पंखे, सतरंज्या असल्यामुळे येणार्या नातेवाइकांची सोय झाली. रात्री नऊ वाजेपर्यंत पार्थीव मदरशातच ठेवण्यात आले होते. सर्व नातेवाईक आल्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली आणि अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. हिंदू-मुस्लीम समाजाची संमिश्र वस्ती असल्यामुळे जुने नाशिककडे संवेदनशील परिसर म्हणून बघितले जाते. काही किरकोळ वादविवादाच्या घटना वगळता जूने नाशिक परिसरात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे अनेकदा दर्शन घडले आहे. तसेच पारंपरिक ताबुतच्या प्रथेमधूनही त्याची प्रचिती येतेच हे येथील वैशिठ्येच म्हणावे लागेल.
हिंदू-मुस्लीम ‘साथ-साथ’
By admin | Updated: June 5, 2014 01:04 IST