शासनाकडून ‘भोसला’ला हेलिकॉप्टरची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:41 IST2019-06-17T00:40:56+5:302019-06-17T00:41:33+5:30
महाराष्ट शासन लिखित निळ्या रंगाचे जुने भूमिस्थ डॉफिन एएस-३६५ एन व्हीटी एमजीके हेलिकॉप्टर मुंबईहून एका कंटेनरवरून शहरात आणले गेले. राज्य शासनाकडून जुने झालेले हेलिकॉप्टर भोसला सैनिकी शाळेला देणगी स्वरूपात दिले गेले.

शासनाकडून ‘भोसला’ला हेलिकॉप्टरची भेट
नाशिक : महाराष्ट शासन लिखित निळ्या रंगाचे जुने भूमिस्थ डॉफिन एएस-३६५ एन व्हीटी एमजीके हेलिकॉप्टर मुंबईहून एका कंटेनरवरून शहरात आणले गेले. राज्य शासनाकडून जुने झालेले हेलिकॉप्टर भोसला सैनिकी शाळेला देणगी स्वरूपात दिले गेले. सैनिकी शाळा असल्यामुळे येथे प्रदर्शित करण्यासाठी हेलिकॉप्टर देण्यात आल्याची माहिती सहकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांनी दिली.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला सैनिकी शाळेला राज्य शासनाकडून जुने हेलिकॉप्टर प्रदर्शित करण्यासाठी दिले गेले. रविवारी (दि.१६) दुपारी मुंबईहून एका १८चाकी कंटेनरवरून हेलिकॉप्टर नाशिकमध्ये दाखल झाले. भोसला स्कूलच्या आवारात कंटेनर दाखल होताच स्वागत करण्यात आले.
पोलीस आयुक्तालय हद्दीत विल्होळी येथे कंटेनर पोहोचताचतेथून पुढे थेट भोसला सैनिकी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून बंदोबस्त देण्यात आला होता. हेलिकॉप्टरचे पंखे काढून घेण्यात आले असून, निळ्या रंगाचे हेलिकॉप्टर भोसला सैनिकी शाळेत रविवारी पोहोचले. यासाठी कार्यवाह हेमंत देशपांडे, बेलगावकर यांनी राज्य शासनाकडे मागणी केली होती.
हेलिकॉप्टरची वाहतूक मुंबई ते नाशिक एका कंटेनरवरून करण्यात आली. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करताना हे निळे हेलिकॉप्टर अनेकांच्या कुतुहलाचा विषय ठरला. हेलिकॉप्टर शहराच्या हद्दीत आले तेव्हा प्रत्येक चौकामध्ये नागरिकांकडून या कंटेनरवर स्वार हेलिकॉप्टरचे मोबाइलमधून छायाचित्र काढले जात होते.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
उन्हाळी सुटीनंतर सोमवार (दि.१७) पासून शाळा सुरू होणार असून, यानिमित्ताने विद्यार्थी तब्बल महिनाभरानंतर शाळेच्या आवारात प्रवेश करणार आहेत. शालेय मुलांसाठी नवीन असलेल्या या हेलिकॉप्टरसोबत सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहू शकतो.