विरगाव : परिसरातील अनेक गावांत सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अर्धा तास मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गाची धावपळ उडाली तर आठवडे बाजारही विस्कळीत झाला. परिसरातील डोंगरेज, आव्हाटी, वटार, विरगावपाडे, वनोली या गावांसह विरगाव परिसरात सोमवारी पाऊस झाला. शेतात सोंगणी करून ठेवलेला मका झाकण्यासाठी यावेळी शेतकरी वर्गाची मोठी धांदल उडाली. या भागात यंदा मान्सूनचा समाधानकारक पाऊस न पडल्याने सर्वत्र पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. लागवड केलेला लाल कांदा अनेक ठिकाणी पाण्यावाचून शेतकरी वर्गाने अक्षरश: सोडून दिला आहे. या पावसामुळे कांद्याला एका अर्थाने जीवदान मिळाले आहे. तर काढण्यायोग्य स्थितीत असलेला कांदा व द्राक्ष या पिकाला मात्र पावसाचा व खराब वातावरणाचा मोठा फटका बसणार असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
विरगाव परिसरात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 15:19 IST