कोकाटे यांच्या शिक्षेवर आता ५ मार्चला सुनावणी; हरकत घेणाऱ्यांना तीन दिवसांची मुदत
By संकेत शुक्ला | Updated: March 1, 2025 17:43 IST2025-03-01T17:41:58+5:302025-03-01T17:43:12+5:30
१९९५ ते ९७ मध्ये सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याचा आरोप काेकाटे यांच्यावर आहे.

कोकाटे यांच्या शिक्षेवर आता ५ मार्चला सुनावणी; हरकत घेणाऱ्यांना तीन दिवसांची मुदत
संकेत शुक्ल, नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय काेकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत राखून ठेवलेल्या निकालाची सुनावणी होण्याआधीच कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका शनिवारी (दि. १) दाखल झाल्याने सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली.
आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळत ही सुनावणी ५ मार्च रोजी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले. यापूर्वी झालेल्या सुनावणीत कोकाटे यांच्यासह त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना कागदपत्र फेरफार अन् फसवणूक केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आले होते. १९९५ ते ९७ मध्ये सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याचा आरोप काेकाटे यांच्यावर आहे.
या निर्णयाला कोकाटे यांनी आव्हान देत शिक्षा स्थगितीसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत १ मार्च रोजी यासंदर्भात निकाल देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याचदरम्यान शनिवारी सकाळी ॲड. सतीश वाणी आणि आशुतोष राठोड यांनी पुन्हा शिक्षेच्या स्थगितीला आदेश देणाऱ्या याचिका दाखल करीत त्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयांचा दाखला दिला. त्यानुसार शिक्षेची स्थगिती उठवून आ. कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवावी, ही मागणी त्यात करण्यात आली होती. मात्र, जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी स्थगिती देण्याची याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना वरिष्ठ न्यायालयात हरकत दाखल करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली. तीन दिवसांत तुम्ही उच्च न्यायालयात जा अथवा ५ मार्च रोजी निकाल जाहीर करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
शिक्षेच्या स्थगितीला आव्हान देण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाचे निकाल देत याचिका दाखल केली होती. आताही आम्हाला तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. आमदार आहे म्हणून त्यांच्या शिक्षेला स्थगिती देता येणार नाही. त्याविरोधात आम्ही लढणार आहोत.
-ॲड. सतीश वाणी