नाशिक- शहरात कडक निर्बंध लागू करताना भाजीपाल्यास परवानगी देण्यात आली खरी मात्र, असे करताना त्यासाठी आरोग्य नियमांचे पालन करणे सक्तीचे करण्यात आले; परंतु ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर भाजी बाजार असताना त्याठिकाणी सॅनिटायझर ना मास्क किंबहुना सुरक्षित एक मीटर अंतराचे पालनदेखील केले जात नसल्याचे आढळले आहे. नाशिक शहरात कोरोना वाढत असताना गेल्या ५ एप्रिलपासूनच शहरात निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, त्याचे फारसे पालन होताना दिसत नव्हते. त्यानंतर २२ एप्रिलपासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यावेळी देखील तीच स्थिती कायम राहिली. वास्तविक कोरोनाकाळात भाजी बाजार कसे असावेत तेथे कोणत्या नियमांचे पालन हवेत याबाबत गेल्यावर्षीच नियम जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार भाजीविक्रेत्यांकडे मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोज बंधनकारक आहे शिवाय दुकानासमोर किमान एक मीटर अंतरावर ग्राहक राहील याबाबत देखील नियम करण्यात आला आहे. गेल्यावर्षी फिजीकल डिस्टन्सिंगसाठी दुकानांसमोर चाैकाेन आणि वर्तुळही तयार करण्यात आले. मात्र, कोराेनाबाधितांचा आकडा कमी होताच सर्व नियम बाजूला सारले गेले आता १२ ते २३ मेदरम्यान कडक लॉकडाऊन असताना शहरात सात बारावाजेपर्यंतच भाजी बाजार आहे. त्यावेळी नियम पालनाची सक्ती असली तरी प्रत्यक्षात ‘लोकमत’च्या रिॲलिटी चेकमध्ये आढळली नाही.
इन्फो...
काय आढळले रियॅलिटी चेकमध्ये
१ महापालिकेने आखणी न करून दिलेल्या ठिकाणीदेखील भाजी बाजार भरत आहे. मात्र, त्याठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन आढळले नाही.
२ सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला, नागरिक गर्दी करून खरेदी करत होते.
३ मास्कचा वापर जेमतेम होता, बोलताना अनेकजण मास्क बाजूला करून बोलत होते.
४ सॅनिटायझर काही दुकानदारांकडे व्यक्तिगत वापरासाठी होते.
५ सुरक्षित अंतराचे पालन नाही तसेच ग्लोजदेखील वापरण्यात येत नव्हते.
इन्फो..
जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंधाबाबत काढलेल्या आदेशात महापालिकेने भाजी बाजाराची आखणी करावी असे जाहीर केले होते. मात्र, नवीन आखणी केल्याचे आणि ते जाहीर केल्याचे आढळले नाही. त्याच प्रमाणे कर्मचारी नियुक्त करून आरोग्य नियमांचे पालक होते किंवा नाही हे तपासण्यास सांगितले होते. मात्र, अनेक बाजारांमध्ये कर्मचारीच नियुक्त नव्हते मग नियमांचे पालन होत नाही म्हणून बाजार दहा दिवस बंद कसा ठेवणार, असाही प्रश्न निर्माण झाला.