प्रभाग सभेत उमटले धोकादायक कार्यालयाचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:42 IST2019-07-31T00:42:34+5:302019-07-31T00:42:58+5:30
महापालिकेचे पूर्व विभागाचे कार्यालय धोकादायक बनले असून, दोनच दिवसांपूर्वी या कार्यालयाचा काही भाग कोसळल्याने त्याचे पडसाद पूर्व विभागाच्या बैठकीत उमटून सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुशीर सय्यद व श्याम बडोदे यांनी मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवून सभात्याग केला.

प्रभाग सभेत उमटले धोकादायक कार्यालयाचे पडसाद
इंदिरानगर : महापालिकेचे पूर्व विभागाचे कार्यालय धोकादायक बनले असून, दोनच दिवसांपूर्वी या कार्यालयाचा काही भाग कोसळल्याने त्याचे पडसाद पूर्व विभागाच्या बैठकीत उमटून सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुशीर सय्यद व श्याम बडोदे यांनी मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवून सभात्याग केला.
पूर्व विभागाची बैठक सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मनपाचे पूर्व विभागाचे कार्यालय धोकादायक बनले असून, गेल्या दोन दिवसांपूर्वी सदर इमारतीचा काही भाग ढासळला आहे त्यामुळे इथे बसणे सुद्धा धोकादायक बनले आहे. वारंवार सांगूनही सदर इमारतीची दुरुस्ती केली जात का नाही, असे म्हणत मुशीर सय्यद व श्याम बडोदे यांनी सभात्याग करून भरपावसात कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडले. या दोघांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. काही वेळाने मुशीर सय्यद सभात्याग करून निघून गेले. मुंबई नाका ते सारडा सर्कल रस्त्याच्या दुतर्फा भंगार वाहने उभी करण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच भद्रकाली मार्केट बाहेर रस्त्यावर सर्रास मासेविक्रेते बसतात. त्यामुळे वाहतुकीचा ताण निर्माण होत असताना अतिक्रमण विभाग बघायची भूमिका घेत आहे. सदर विभागाचे अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप समिना मेमन यांनी केला. अतिक्रमण न काढल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. इंदिरानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली. रथचक्र चौकात पुन्हा भाजीबाजार बसण्यास सुरुवात झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन दोन दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाला एका वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरीही अतिक्रमण विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचे आरोप कुलकर्णी यांनी केला. जॉगिंग ट्रॅकलगत काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण विभागांनी मंदिर काढले, परंतु त्या ठिकाणी गॅरेजधारकांनी गॅरेज दुरुस्तीचे आणि वाहने लावण्यासाठी वापर सुरू केला असल्याची तक्रार श्यामला दीक्षित यांनी केली.
भूमिगत गटारीचे दुरुस्तीचे काम करणारा ठेकेदार व अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने कामे होत नसल्याची तक्रार श्याम बडोदे यांनी केली. तसेच वडाळागावात भूमिगत गटारीचे कामे होऊन सुद्धा रस्त्याची दुरुस्ती ठेकेदार का करत नाही, असा प्रश्न बडोदे यांनी केला. जाकीर हुसैन रुग्णालयात रुग्णांवर औषध उपचार बरोबर होत नाही, अशी तक्रार अर्चना थोरात यांनी केली.
त्रिकोणी उद्यान व काठेगल्ली सिग्नल ते नागजी हॉस्पिटल या रस्त्यावरील अतिक्रमण काढत नसल्याचा आरोपही थोरात यांनी केला. पूर्व विभागाचे कार्यालय धोकादायक झाल्याने जिवास धोका निर्माण झाल्याने तरीही प्रशासन जागे होत नसल्याने मनपा प्रशासनाला अजिंक्य साने, सुप्रिया खोडे, सुषमा पगार या सर्व सदस्यांनी धारेवर धरले. यावेळी खेळणी व बेंचेस टाकण्याच्या सुमारे एक कोटींच्या कामाला मंजुरी देण्यात आली.