द्राक्षाला नीचांकी भाव
By Admin | Updated: April 29, 2017 01:03 IST2017-04-29T01:03:04+5:302017-04-29T01:03:15+5:30
सायखेडा : द्राक्षाला किलोमागे केवळ १० रुपये असा नीचांकी भाव मिळू लागला असल्याने द्राक्ष बागायतदार चिंतित झाले आहे.

द्राक्षाला नीचांकी भाव
सायखेडा : निफाड तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या द्राक्षाला किलोमागे केवळ १० रुपये असा नीचांकी भाव मिळू लागला असल्याने द्राक्ष बागायतदार चिंतित झाले असून, जिल्ह्यात एकूण ३५ टक्के द्राक्षक्षेत्र खुडणीच्या प्रतीक्षेत असल्याने भाव अजून किती गडगडतील याचा विचार करूनच उत्पादक हवालदिल झाले आहेत. हा दहा वर्षांतील सर्वात नीचांकी भाव आहे.
एक एकर द्राक्षबाग पिकविण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च येतो. यंदा पिकवलेला माल खरेदीसाठी व्यापारीच बागेत येत नसल्याने केलेला खर्च कसा निघणार याचीच चिंता उत्पादकांना लागून आहे. त्यात मुलीचे लग्न, मुलांवरचा शिक्षणासाठीचा खर्च, दवाखाना आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी लागणारा खर्च यासाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून द्राक्षांकडे पाहिले जाते. अनेक उच्चशिक्षण घेतलेले युवक द्राक्षपीक चांगले पैसे मिळवून देते तसेच या पिकासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देते म्हणून द्राक्षपीक घेण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून द्राक्षपीक पुढे आले. मागील काही वर्षी शेतकऱ्यांना द्राक्षाने चांगले पैसे मिळवून दिले. यंदा मात्र द्राक्षपिकाने शेतकऱ्यांना जिवंतपणीच मरणयातना भोगायला लावण्याची वेळ आणली आहे.
मागील वर्षी या दिवसात द्राक्षाला किलोला ४२ ते ४५ रुपये भाव मिळत होता. यंदा मात्र केवळ १० ते १७ रुपये भाव मिळत आहे. भावात इतक्या मोठ्या घसरगुंडीने उत्पादक चिंतित झाला आहे. सन २०१६ मध्ये निर्यातक्षम द्राक्षाला एप्रिल महिन्यात ७० ते ७५ रुपये भाव मिळत होता, तर यंदा अतिशय कमी प्रमाणात द्राक्ष निर्यात चालू असून, केवळ ३० ते ३७ इतका नीचांकी भाव मिळत आहे. यंदा सव्वा लाख एकर द्राक्ष निर्यातीची नोंद कृषी विभागाकडे आहे, तर २०१६ मध्ये एक लाख पाच हजार एकर नोंद करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत फारशी जास्त नोंद नसली तरी भाव मात्र भाव कमालीचे कोसळले आहेत. २०१६ मध्ये ६९८९ कंटेनरमधून एक लाख १६ हजार १६४ मेट्रिक टन द्राक्ष विदेशात गेले होते, तर यंदा आजपर्यंत ८३५४ कंटेनरमधून एक लाख १४ हजार २६० मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत जास्त निर्यात होऊनदेखील बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांच्या हातात म्हणावे असे पैसे आलेच नाहीत. (वार्ताहर)