कांद्याचे दर पाडून सरकार साधते स्वार्थ : ललित बहाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2022 01:59 IST2022-06-16T01:59:08+5:302022-06-16T01:59:52+5:30
गेल्या काही वर्षांपासून कांदा हा केवळ जीवनावश्यक राहिला नसून, त्याच्या दराबाबत राजकारण सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांवर उत्पादन शुल्क आणि ईडीकडून कारवाई करून कांद्याचे दर पाडले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार न करता सरकार स्वार्थ साधत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी केला. असेच सुरू राहिले तर शेतकरी संघटना सरकारला वठणीवर आणण्याचे काम करेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

कांद्याचे दर पाडून सरकार साधते स्वार्थ : ललित बहाळे
येवला (जि. नाशिक) : गेल्या काही वर्षांपासून कांदा हा केवळ जीवनावश्यक राहिला नसून, त्याच्या दराबाबत राजकारण सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांवर उत्पादन शुल्क आणि ईडीकडून कारवाई करून कांद्याचे दर पाडले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार न करता सरकार स्वार्थ साधत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी केला. असेच सुरू राहिले तर शेतकरी संघटना सरकारला वठणीवर आणण्याचे काम करेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित कांदा परिषदेत बहाळे बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात कमालीची घसरण झाली आहे. कांदा दराच्या घसरणीमागे केवळ परिस्थितीच नाही, तर मोठे राजकारण आहे. कांद्याचे दर घसरले असताना राज्यभर नाफेडकडून कवडीमोल दरात खरेदी केली जात आहे. उद्या शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याला चांगला दर मिळाला तर नाफेडचेच कांदे बाजारात आणून दर आवाक्यात आणले जातात. असा प्रकार निदर्शनास आला तर नाफेडचा कांदा बाजारपेठेत येऊ दिला जाणार नसल्याचे बहाळे यांनी सांगितले.
परिषदेत राजाभाऊ पुसदेकर, सीमा नरोडे, शशिकांत भदाणे, देवीदास पवार, सुधीर बिंदू, अनिल घनवट, माजी आमदार वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञाताई बापट, संतू पा. झांबरे, जिल्हाध्यक्ष शंकरराव ढिकले यांची भाषणे झाली. प्रास्ताविक, सूत्रसंचालन बापूसाहेब पगारे यांनी केले.
------------------