पेट्रोल पंपचालकांकडून सरकारचा निषेध
By Admin | Updated: June 17, 2017 00:43 IST2017-06-17T00:43:18+5:302017-06-17T00:43:30+5:30
नाशिक : इंडियन आॅइल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांनी इंधनाच्या दरात दररोज बदल करणास सुरुवात केली आहे

पेट्रोल पंपचालकांकडून सरकारचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन आॅइल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन मोठ्या कंपन्यांनी शुक्रवारपासून (दि.१६) इंधनाच्या दरात दररोज बदल करणास सुरुवात केली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या या निर्णयाचा नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनतर्फे शनिवार (दि.१७) पासून हातावर काळ्या फिती बांधून निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पेट्रोलियम मंत्रालयांच्या सूचनांनुसार शुक्रवारी सकाळी ६ वाजतापासून पेट्रोलचे दर १ रुपया १२ पैसे व डिझेलच्या दरांमध्ये १ रुपया २४ पैसे एवढी कपात करून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परंतु हा निर्णय पेट्रोल पंपचालकांसाठी अतिशय त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनतर्फे व्यक्त होत आहे. तसेच इंधनाच्या दरांमध्ये होणाऱ्या चढउताराचा प्रवासी वाहतुकीच्या भाड्यावर व मालवाहतुकीवरही परिणाम होत असतो. अशा स्थितीत सरकार रीक्षा, टॅक्सी, बसेची भाडेआकारणी संबंधी रोज टेरीफमध्येही बदल करणार का? असा सवालही पेट्रोल पंपचालकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, पेट्रोल कंपन्यांनी दररोज दर बदलण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी शहरातील काही पेट्रोलपंपांवर शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत नियमित दरांनी पेट्रोल विक्री होत असल्याने नागरिकांनी पट्रोलपंपचालकांविरोत संताप व्यक्त केला. परंतु, दुपारनंतर शहरातील सर्वच पंपचालकांनी रोज दर पंपाचे कोड व कंपन्यांचे एसएमएस क्रमांक असलेले फलक लावून निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.