नाशिक: वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचे काम नाशिकमध्ये गुंडांकडून सुरूच असून हल्लेखोरांना कायद्याचा धाक उरला नसल्याचे या घटनांमधून दिसून येते. औद्योगिक वसाहत असलेल्या सातपुर येथील श्रमिकनगरात सात ते आठ तर देवळालीगाव रेल्वे मालधक्का रोड येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरात तीन कारच्या काचा अज्ञात टवाळखोरांनी फाेडल्या. बुधवारी (दि.२१) व गुरूवारी (दि.२२) रात्री घटना घडली. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी दोन ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असून संशयित पसार झाले आहेत.
सातपुर परिसरात शुक्रवारी (दि.२३) मध्यरात्री अज्ञात टवाळखोरांनी गाड्यांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळील कडेपठार चौक आणि विश्वकर्मा उद्यान परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी सात ते आठ वाहनांवर दगडफेक केली. श्रमिकनगर परिसरात मागील वर्षी याच भागात डझनभर वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.
देवळालीगाव रेल्वे मालधक्का रोड येथील महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे बुधवारी (दि.२१) मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी चार चाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. भाईगिरीच्या नादातून वाहनांना लक्ष केल्याचा अंदाज आहे. बुधवारी रात्री सव्वा ते दीड वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने संपूर्ण मालधक्का रोड परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्याचा फायदा गुंडांनी घेतला.