गोल्फ क्लब नुतनीकरण रखडले, कॉग्रेसच्या हेमलता पाटील यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 13:49 IST2019-11-13T13:44:45+5:302019-11-13T13:49:57+5:30
नाशिक- शहरातील गोल्फ क्लब येथे नुतनीकरण आणि अन्य सुशोभिकरणाचे काम संथगतीने सुरू असून नागरीकांना त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे कॉँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी गोल्फ क्लब मैदान येथे आज धरणे आंदोलन सुरू केले आहे.

गोल्फ क्लब नुतनीकरण रखडले, कॉग्रेसच्या हेमलता पाटील यांचे धरणे
नाशिक- शहरातील गोल्फ क्लब येथे नुतनीकरण आणि अन्य सुशोभिकरणाचे काम संथगतीने सुरू असून नागरीकांना त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे कॉँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी गोल्फ क्लब मैदान येथे आज धरणे आंदोलन सुरू केले आहे.
गोल्फ क्लब जॉगींग ट्रॅक हा अत्यंत महत्वाचा असून दररोज पंधरा हजार नागरीक व्यायामासाठी येत असतात. मात्र, या गोल्फ क्लबचे नुतनीकरण सुरू करण्यात आले असून त्यासाठी जॉगींग ट्रॅक बंद करण्यात आला आहे. सदरचे काम सुरू असतानाचा वाढीव कामासाठी आर्थिक तरतूद करावी यासाठी ठेकेदाराने काम थांबवले आहे. त्याचा नाहक त्रास नागरीकांना सहन करावा लागत असून हे काम कधी पूर्ण होणार आणि केव्हा पुर्ण होणार हे प्रभागाची नगरसेविका असून आपल्याला माहिती नाही असा डॉ. पाटील यांचा आरोप आहे. त्यामुळे जो पर्यंत काम केव्हा सुरू होणार आणि केव्हा नाही हे स्पष्ट होत नाही तो पर्यंत गोल्फ क्लब येथे धरणे सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोल्फ क्लब हा ब्रिटीशकालीन असून सध्या याठिकाणी क्रिकेट ग्राऊंड आहे तसेच जॉगींग ट्रॅक आणि ओपन जीम असून त्याठिकाणी नागरीक मोठ्या संख्येने येत असतात. शहरात मल्टीपर्पज वाहनतळची निकड असताना देखील त्याचा निधी या कामासाठी वळविण्यात आला आहे. सदरचा जॉगींग ट्रॅक चांगला असताना देखील शासनाचा पाच कोटी रूपयांचा निधी आणि महापालिकेचा ६.२७ कोटी रूपये याप्रमाणे ११ कोटी २७ लाख २८ हजार ५३५ इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. त्यातून जॉगींग ट्रॅकचे नुतनीकरण, सायकल ट्रॅक, संरक्षक भिंतीचे नुतनीकरण, पेव्हर ब्लॉक, स्वच्छता गृह या कामांचा यात समावेश आहे.