नाशिक : वडाळारोडवरील दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या भारतनगर झोपडपट्टीमधील एका मंडप साहित्याच्या गुदामाने गुरूवारी (दि.१५) दुपारच्या सुमाराच अचानकपणे पेट घेतला. वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे व मंडपाचे कापडी साहित्याने गुदाम गच्च भरलेलेले असल्याने क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी टळली; मात्र तीन ते चार रहिवाशांना आगीची झळ बसली.याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, भारतनगरच्या नुरी गल्लीमध्ये असलेल्या एजाज बागवान यांच्या मंडप व्यवसायाच्या साहित्याचे पत्र्याचे एकमजली गुदाम आहे. या गुदामाला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा अंदाज अग्निशामक दलाकडून वर्तविण्यात आला आहे. गुदामामध्ये मंडप उभारणी व सजावटीसाठी लागलणारे कापडी-प्लॅस्टिकचे साहित्य भरलेले होते. त्यामुळे वा-याच्या वेगाने क्षणार्धात आगीने भीषण स्वरुप धारण केल्याने संपुर्ण गुुदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आकाशात धुराचे लोट व ज्वाला भडकल्याचे चित्र दूरवरुन दिसत होते. दरम्यान, गस्तीवर असलेले पोलीस हवालदार संजय लोंढे हे भारतनगरमधून जात असताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ बिनतारी संदेश यंत्रणेवरुन पोलीस नियंत्रण कक्षाला घटना कळविली. नियंत्रण कक्षातून माहिती अग्निशामक मुख्यालयाला देण्यात आली. तत्पुर्वी शाहरूख शेख या नागरिकाने मुख्यालयाला घटना भ्रमणध्वनीवरुन कळविली होती. तोपर्यंत शिंगाडा तलाव येथील दोन बंब घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. तोपर्यंत आगीने भीषण रुप धारण केले होते. तत्काळ मुख्यालयाने पंचवटी विभागीय केंद्रासह उपनगरीय केंद्रांना बिनतारी संदेश यंत्रणेवरुन घटनास्थळी मदतीचा दाखल होण्याचा ‘कॉल’ दिला.
मुख्यालय -२ सिडको-२नाशिकरोड-१ सातपूर-१पंचवटी विभागीय केंद्र१ सात बंबांच्या सहाय्याने सबस्टेशन आॅफिसर दिपक गायकवाड, फायरमन राजू पाटील, घनश्याम इंफाळ, उदय शिर्के, मंगेश चंद्रात्रे, ज्ञानेश्वर दराडे, संजय राऊत, जगन्नाथ पोटिंदे, रमेश बैरागी, प्रदीप बोरसे, सुनील पाटील, राजेंद्र सोनवणे, श्याम काळे पाण्याचा मारा सुरू करत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे आपत्कालीन कार्य जवानांकडून सुरू करण्यात आले. सुमारे दीड तास अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले.