विहिरीत उडी घेतलेल्या शेतमजुराला जीवनदान; अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 04:07 PM2021-01-11T16:07:42+5:302021-01-11T16:08:54+5:30

यावेळी पाण्याचा आवाज झाल्याने शेतीचे मालक त्र्यंबक कोंबडे यांच्यासह अन्य रहिवाशी शेतमजुरांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. कोंबडे यांनी याबाबत इंदिरानगर पोलिसांसह अग्निशमन दलाशी संपर्क करून माहिती दिली.

Giving life to a farm laborer who jumped into a well; Firefighting rescue operation | विहिरीत उडी घेतलेल्या शेतमजुराला जीवनदान; अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन

विहिरीत उडी घेतलेल्या शेतमजुराला जीवनदान; अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन

Next
ठळक मुद्देगौळाणे रोडवरील कोंबडे मळ्यातील घटना

नाशिक : पाण्याने तुडुंब भरलेल्या गौळाणे रोडवरील एका शेतातील विहिरीत ४२ वर्षीय शेतमजुराने सोमवारी (दि.११) दुपारच्या सुमारास अचानकपणे उडी घेतली. ही बाब शेतमालकाच्या लक्षात येतात परिसरातील रहिवाशांनी विहिरीजवळ धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाशी संपर्क साधून आपत्कालीन मदत घेण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या सिडको उपकेंद्रावरील जवानांनी घटनास्थळी धाव घेत तासाभराच्या अथक परिश्रमानंतर विहिरीतून त्या शेतमजुराला सुखरूपपणे बाहेर काढले.

याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी-गौळाणे रस्त्यावरील यशवंतनगरमधील कोंबडे मळ्यात असलेल्या विहिरीत त्यांच्याच शेतात शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या सुनील सोना गांगुर्डे (४२) या व्यक्तीने अचानकपणे दुपारच्या सुमारास विहिरीजवळ जात कठड्यावरून विहिरीत उडी घेतली. यावेळी पाण्याचा आवाज झाल्याने शेतीचे मालक त्र्यंबक कोंबडे यांच्यासह अन्य रहिवाशी शेतमजुरांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी गांगुर्डे हे पाण्यात पडलेले होते आणि विद्युत पंपाच्या पाइपचा आधार घेत, तरंगत असल्याचे दिसून आले. कोंबडे यांनी याबाबत इंदिरानगर पोलिसांसह अग्निशमन दलाशी संपर्क करून माहिती दिली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्रप्रमुख लीडिंग फायरमन देविदास चंद्रमोरे, फायरमन प्रमोद लहामगे, जगदीश देशमुख, सुनील शिलावट, रवी आमले आणि बंबचालक नंदू व्यवहारे यांनी सर्व साधनसामुग्रीसह तत्काळ काही मिनिटांत घटनास्थळ गाठले. विहिरीत पडलेले गांगुर्डे यांना बाहेर काढण्यासाठी जवानांनी सर्वप्रथम विहिरीत ॲल्युमिनियमची मोठी शिडी व दोरखंड सोडला. विहिरीजवळ जमलेले रहिवाशी, तसेच जवानांनी गांगुर्डे यांना शिडीच्या साहाय्याने बाहेर येण्यास वारंवार सांगितले. मात्र, ते पाइप सोडून येण्यास धजावत नव्हते. यामुळे काही जवान विहिरीत उतरले आणि त्यांनी गांगुर्डे यांच्या कमरेला दोरखंड बांधून शिडीवरून सुखरूपपणे बाहेर काढले. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर जवानांना त्यांना रेस्क्यू करण्यास यश आले.
-----

Web Title: Giving life to a farm laborer who jumped into a well; Firefighting rescue operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.