शासन-प्रशासनालाही ‘नॅब’च्या कार्यासमान दृष्टी लाभो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:06+5:302021-02-05T05:45:06+5:30

नाशिक : ‘नॅब’संस्थेच्या माध्यमातून दृष्टिबाधितांसाठी झटणाऱ्यांचे कार्य खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्यासारखे कार्य करण्याची प्रेरणा शासन-प्रशासनातील लोकांना मिळाली आणि समाजोपयोगी ...

Give the government-administration the same vision as the NAB | शासन-प्रशासनालाही ‘नॅब’च्या कार्यासमान दृष्टी लाभो

शासन-प्रशासनालाही ‘नॅब’च्या कार्यासमान दृष्टी लाभो

नाशिक : ‘नॅब’संस्थेच्या माध्यमातून दृष्टिबाधितांसाठी झटणाऱ्यांचे कार्य खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्यासारखे कार्य करण्याची प्रेरणा शासन-प्रशासनातील लोकांना मिळाली आणि समाजोपयोगी कार्याची दृष्टी लाभली तर समाजापुढे काही प्रश्नच उरणार नाहीत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. त्याआधी राज्यपालांच्या हस्ते ‘नॅब’च्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

सातपूरमधील नॅब कार्यालयाच्या परिसरात अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासह निवासासाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. राज्यपालांना पुणेरी पगडी घालून आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आाले. यावेळी राज्यपालांनी नॅबच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आपल्या देशातील पूजास्थळे, धर्मशाळा आणि अनेक समाजोपयोगी वास्तू या जनतेच्या माध्यमातूनच उभारण्यात आल्या असल्याचे राज्यपालांनी सांगितले. त्याप्रमाणेच ३६ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली नॅबसारखी संस्थादेखील समाजाच्या दानशूर लोकांकडूनच चालवली जाणे कौतुकास्पद आहे. दिव्यांगांना साक्षर बनवितानाच त्यांना प्रेरणा देण्याचे कार्य खूप विशेष असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या समाजात आजही अनेकजण समाजासाठी तन, मन, धनाने झटत असल्याचे बघून मीदेखील भावविभोर होतो, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी केले. राज्यपाल हे नॅबचे पदसिद्ध अध्यक्ष असले तरी इथे येणारे तुम्ही पहिले अध्यक्ष असल्याचे कलंत्री यांनी सांगितले. संस्थापक विश्वस्त देवकिसनजी सारडा यांनी त्यांच्या सन्मानाबद्दल संस्थेचे आणि राज्यपालांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थितांचे आभार मानद महासचिव गोपी मयूर यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर सूर्यभान साळुंखेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, राजेंद्र कलाल, नितीन पाटील, भगवान वीर, नॅबचे पदाधिकारी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, ॲड. अजय निकम,यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

यापूर्वीचे राज्यपाल; मी तर राज्यसेवक !

‘नॅब’च्या कार्यक्रमात आलेला मी पहिला राज्यपाल असल्याचे मला सांगण्यात आले. यापूर्वीचे सर्व राज्यपाल होते, त्यांना राज्याचे पालन करावे लागत होते. मी तर राज्यसेवक असून, सेवा करणे हेच माझे कार्य आहे. कुणी प्रत्यक्ष योगदान देतात, कुणी अप्रत्यक्ष देतात त्यामुळे त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघू नका, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगताच एकच हास्यस्फोट झाला.

इन्फो

भामाशाहांचे महत्वदेखील तितकेच मोठे

आपल्या देशात मोठमोठे राजे, सेठ होऊन गेले. पण इतिहासाने त्यांचीच नोंद ठेवली, ज्यांनी समाजासाठी मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. महाराणा प्रताप हे आपल्या स्वाभिमानासाठी लढले, त्यामुळे ते महान आहेतच. पण त्याचबरोबर त्यांना गरजेच्या काळी आर्थिक मदत करणारे भामाशाहसारख्या व्यक्ती होत्या, म्हणून ते प्रदीर्घ काळ लढू शकले. त्यामुळे समाजात असणाऱ्या अशा दानशूर भामाशाहांचेदेखील तितकेच महत्व आहे. शंभर हातांनी धन कमवा आणि हजार हातांनी ते जनतेला वाटा हे आपल्या संस्कृतीतही सांगितले असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

इन्फो

रोप मल्लखांबपटू मुलींना दिले चॉकलेट

प्रशिक्षक यशवंत जाधव यांनी अंध विद्यार्थिनींकडून सादर करुन घेतलेल्या रोप मल्लखांबचे प्रात्यक्षिक बघून राज्यपाल आश्चर्यचकीत झाले. या बालिकांची प्रात्यक्षिके सादर केल्यानंतर राज्यपालांनी त्या सर्व बालिकांना प्रेमाने चॉकलेट देऊन त्यांचे मनापासून कौतुक केले. तसेच भाषणातदेखील या मुलींचे कौतुक करताना इथले अधिकारी, पोलीसांनी त्या दोरीवर चढण्याचा जरी प्रयत्न केला, तरी ते खाली पडतील असे सांगून या मुलींची आणि त्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांकडे काही विशेष दैवी शक्ती असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले.

इन्फो

असेही अधिकारी होते

सकाळी मी सटाण्याला गेलो, तिथे यशवंतमहाराज मामलेदार यांच्यासारखे समाजासाठी सर्वस्व अर्पण करणारे अधिकारी होऊन गेल्याचे मला कळल्यावर मी त्यांच्याकडून पुस्तक मागून घेतले असून ते आता जेव्हा विद्यापीठांमध्ये जाईन, तेव्हा विद्यार्थ्यांना दाखवून असे अधिकारी बना सांगेन, असेही त्यांनी नमूद केले.

इन्फो

सारडा यांचा पुणेरी पगडी घालून सत्कार

नॅबच्या स्थापनेत प्रमुख योगदान दिलेले संस्थापक विश्वस्त देवकिसन सारडा यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणेरी पगडी घालून मानपत्र आणि शाल, स्मृतिचिन्ह देऊन विशेेष सत्कार करण्यात आला. त्याशिवाय राहुल चांडक, विवेक चांडक, अशोक बंग, आरती बंग, सुरेश केला, मधु काबरा, संध्या मयूर, रिद्धी शहा या दानशूर व्यक्तींचादेखील विशेष गौरव करण्यात आला. तर माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा पुरस्काराने सन्मानित दिव्यांग विद्यार्थी वेदांत मुंदडा यालादेखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

फोटो

९६ - नॅबच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.

८५- नॅबच्या वस्तीगृह इमारतीचे भूमीपूजन करताना राज्यपाल भगतिसंह कोश्यारी. समवेत अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, श्रीमती मंगला कलंत्री, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे्य, अपर्णा कोठावळे आदी.

१००- रोप मल्लखांबचे थरारक प्रात्यक्षिक राज्यपालांसमोर सादर करताना नॅब शाळेच्या अंध विद्यार्थिनी.

Web Title: Give the government-administration the same vision as the NAB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.