सटाणा : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथे गॅस सिलिंडरला गळती लागून स्फोट झाल्याने जखमी झालेल्या एका महिलेसह चार वर्षांच्या चिमुरडीचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.मुल्हेर येथील भरबाजारपेठेत गेल्या १७ आॅगस्टला दुपारच्या सुमारास अचानक भिकन भामरे यांच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या भीषण आगीत दुकान मालक भामरे यांच्या पत्नी अमिता भामरे (४०) व रिद्धी राकेश काळे (४) या भाजल्या होत्या. त्यांना तत्काळ नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र गंभीर भाजल्याने दोघांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.अमिता भामरे यांच्या पश्चात पती, दोन मुलगे आहेत तर चाळीसगावहून मामाच्या गावी आलेली रिद्धी ही भामरे यांच्या दुकानाजवळ खेळत असताना क्रूर काळाने तिच्यावर झडप घातले. त्यांच्या या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिलिंडर स्फोटातील जखमी महिलेसह बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:11 IST