घाटांचा ‘घाट’... आला अंगलट
By Admin | Updated: October 6, 2015 00:11 IST2015-10-06T00:06:34+5:302015-10-06T00:11:40+5:30
भाविकांनी फिरविली पाठ : सव्वाशे कोटी पाण्यात

घाटांचा ‘घाट’... आला अंगलट
नाशिक : कुंभमेळ्यात शाही पर्वणीच्या दिवशी कोट्यवधी भाविकांची होणारी संभाव्य गर्दी नाशकातील रामकुंड व त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तात सामावणार नसल्याचा अंदाज बांधून भाविकांची दिशाभूल करण्यासाठी जागोजागी बांधलेल्या ‘रामघाटा’कडे पर्वणीच्या दिवशीच भाविकांनी पाठ फिरविल्याने सुमारे सव्वाशे कोटी रुपये खर्च करून निर्मिलेल्या घाटांचा घाट अखेर कोणी व कशासाठी घातला होता, हे कुंभमेळा आटोपल्यावरही स्पष्ट होऊ शकले नाही. शासनाच्या निधीची अशा प्रकारे करण्यात आलेली उधळपट्टी निरर्थक ठरल्याने या घाटांमुळे नाशिकच्या सौंदर्यात भर पडण्याचे स्वप्न दाखवून प्रशासनाकडून सारवासारवीचेही प्रयत्न आता सुरू झाले आहेत.
दक्षिणवाहिनी झालेल्या गोदावरीच्या तोंडाशीच असलेल्या रामकुंडाला व ब्रह्मगिरीवर उगम पावून थेट कुशावर्तातच गोदावरी प्रगट होत असल्यामुळे या दोन्ही ठिकाणांना पुराणातच महत्त्व देण्यात आलेले आहे. कुंभमेळ्याच्या शाही पर्वण्यांच्या काळात याच स्थानावर स्रानाला विशेष महत्त्व असल्यामुळे साधू-महंतांच्या आखाडे, खालशांच्या इष्टदेवतांनाही याच ठिकाणी शाहीस्रान घातले जाते, साधू-महंत व त्यांचे इष्टदेवता या ठिकाणी स्रान करतात म्हणून त्यांच्यामुळे पवित्र झालेल्या ठिकाणांवरच स्रान करण्याला भाविकही महत्त्व देतात, हे सारे जाणून असलेल्या प्रशासनाने यंदाच्या कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची दिशाभूल करण्यासाठी नाशकात टाळकुटेश्वर पुलाच्या पुढेपासून घाट बांधण्याचा निर्णय घेतला.
लक्ष्मीनारायण घाट, टाकळी घाट, दसक घाट अशा घाटांची निर्मिती करून बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना जणू हेच ‘रामघाट’ आहेत असे भासवून याच घाटावर स्रान करावे, अशी वाहतूक व्यवस्थाही करून हे भाविक रामकुंडापर्यंत पोहोचणार नाहीत, याची खबरदारीही घेतली. प्रत्यक्षात पहिल्या पर्वणीला पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे भाविकांनीच या घाटांकडेच नव्हे, तर पर्वणीकडेच पाठ फिरविली. तर दुसऱ्या पर्वणीलाही बोटावर मोजण्याइतक्या भाविकांनी पर्याय नसल्यामुळे घाटावर स्रान केले. तिसऱ्या पर्वणीला तर मुसळधार पावसानेच सारे नियोजन कोलमडून पडल्याने अखेर घाटांवर स्रानासाठी जाऊ पाहणाऱ्या भाविकांना गळ घालून रामकुंडाकडे बोलवावे लागले.
नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वरी- देखील कुंभमेळ्यासाठी येऊ पाहणाऱ्या भाविकांची दिशाभूल करण्यात आली, त्यासाठी चक्क स्मशानभूमीला लागून दुतर्फा घाट बांधण्यात आला. अहल्या धरणाच्या पायथ्याशीही दोन घाट उभारण्यात आले. गावाच्या बाहेर व कुशावर्तापासून दोन किलोमीटर अंतरावरही घाटाची निर्मिती करून भाविकांनी बाहेरच्या बाहेर गोदावरीत स्नान करून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश करू नये, अशी व्यवस्था करण्यात आली. परंतु नाशिकमध्ये जे घडले, त्याचीच पुनरावृत्ती त्र्यंबकेश्वरमध्ये झाली व प्रशासनाचे दात त्यांच्याच घशात गेले. बोटावर मोजण्याइतक्या भाविकांनीदेखील या नवीन घाटांवर स्रान केले नाही. नाशिकमध्ये नव्याने घाट बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला पर्यावरणप्रेमींकडून प्रचंड विरोध करण्यात आला. त्याचबरोबर स्मशानभूमीला लागून कोण स्रान करणार, असा धार्मिक प्रश्नही उपस्थित झाला.
लोकप्रतिनिधींनी उघडपणे या घाट बांधणीला विरोध दर्शविलेला असताना त्यांचीही दिशाभूल करण्यात प्रशासन यशस्वी झाले, परिणामी सव्वाशे कोटी रुपये खर्च करून घाट बांधण्याचे पुण्यकर्म पार पाडण्यात आले.
गत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरीकाठी तयार करण्यात आलेल्या घाटांची आजची अवस्था पाहता, त्याचा उपयोग वाहने, जनावरे व कपडे धुण्यासाठी होऊ लागला आहे, किमानपक्षी ते त्या उपयोगी तरी पडले. मात्र यंदा बांधलेल्या नवीन घाटांकडे या घाट बांधणीचा घाट बांधणाऱ्यांनी सहज चक्कर मारली तरी पुरे होईल ! (प्रतिनिधी)