नाशिकमध्ये परवानगीसाठी पथकच गणेश मंडळांच्या दाराशी
By श्याम बागुल | Updated: September 6, 2018 15:25 IST2018-09-06T15:20:33+5:302018-09-06T15:25:07+5:30
गणेश मंडळांना लागणा-या विविध परवानग्यांसाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली होती, परंतु पहिली परवानगी कोणी द्यायची यावर एकमत होत नसल्याने गणेश मंडळांना परवानगीसाठी चालढकल केली जात होती. त्यावर सर्वत्र असंतोष निर्माण झाल्यावर महापालिका आयुक्तांबरोबर गणेश

नाशिकमध्ये परवानगीसाठी पथकच गणेश मंडळांच्या दाराशी
नाशिक : गणेशोत्सव कालावधीत विविध परवानग्या घेण्यासाठी दरवर्षीच सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची होणारी दमछाक टाळण्यासाठी प्रशासनाने यंदा यावर तोडगा काढत मंडळांची ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी एक खिडकी पथक मंडळांच्या दारी योजना सुरू केल्याने यावर्षी पासून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांची विविध परवानग्यांसाठी होणारी दमछाक थांबणार आहे.
गणेश मंडळांना लागणा-या विविध परवानग्यांसाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली होती, परंतु पहिली परवानगी कोणी द्यायची यावर एकमत होत नसल्याने गणेश मंडळांना परवानगीसाठी चालढकल केली जात होती. त्यावर सर्वत्र असंतोष निर्माण झाल्यावर महापालिका आयुक्तांबरोबर गणेश मंडळ पदाधिका-यांच्या झालेल्या बैठकीत परवानगीसाठी लागणा-या अटी, नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एक खिडकी योजनेतील पथक थेट उत्सवासाठी परवानगी मागणा-या मंडळांच्या ठिकाणी जाऊन तेथे भेटी देत पाहणी करून अंतिम परवानगी पोलीस प्रशासन देणार आहे. स्थानिक पोलिस ठाण्यातील कर्मचारी, शहर वाहतूक शाखा, मनपा बांधकाम, अग्निशामक व वीजवितरण कंपनी अधिका-यांचा पथकात समावेश करण्यात आला आहे.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारणीला परवानगी मिळावी यासाठी ज्या मंडळांनी मनपा प्रशासनाकडे अर्ज सादर केले आहेत त्या मंडळांचे अर्ज घेऊन पथक दैनंदिन त्या भागात जाऊन मंडळांच्या भेटी घेत आहेत. तेथे गेल्यानंतर मंडप उभारणीसाठी किती जागेची परवानगी घेतली याची तपासणी करून रस्त्याचा मोजमाप वाहतुकीला अडथळा होणार नाही धोकेदायक वीजतारा याची पाहणी पथकाकडून केली जात आहे. सर्व पाहणी झाल्यानंतर काही अडचण येऊ शकता की नाही याबाबत मनपा, वाहतूक शाखा, वीज वितरण कंपनी पोलीस ठाण्यांना ना हरकत दाखला देतील व संबंधित पोलीस ठाणे पुढे सहायक पोलीस आयुक्तांकडे अहवाल सादर करतील त्यानुसार रीतसर परवानगी मिळणार आहे.