वातावरणात गारठा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:02 IST2019-12-30T00:57:18+5:302019-12-30T01:02:12+5:30
नाशिक : शहराचा किमान तापमानाचा पारा ११ अंशांवरून १३.६ अंशांपर्यंत रविवारी (दि.२९) वर सरकला; मात्र थंड वाऱ्याचा वेग शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारीदेखील टिकून राहिल्यामुळे नाशिककरांना दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. संध्याकाळ होताच पुन्हा थंडीचा जोर वाढल्याचा अनुभव नाशिककरांना आला. यामुळे रविवारची सुटी असूनही रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

वातावरणात गारठा कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहराचा किमान तापमानाचा पारा ११ अंशांवरून १३.६ अंशांपर्यंत रविवारी (दि.२९) वर सरकला; मात्र थंड वाऱ्याचा वेग शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारीदेखील टिकून राहिल्यामुळे नाशिककरांना दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. संध्याकाळ होताच पुन्हा थंडीचा जोर वाढल्याचा अनुभव नाशिककरांना आला. यामुळे रविवारची सुटी असूनही रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.
शहरात शुक्रवारी सकाळपासून थंड वारे वेगाने वाहू लागल्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.
थंडीचा कडाका वाढताच बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना पहावयास मिळत आहे. बहुतांश नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. किमान तपमानात घट शनिवारी पारा अधिकच घसरल्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली. या हंगामातील सर्वाधिक नीचांकी ११.४ अंशांपर्यंत तापमानाचा पारा शनिवारी घसरला होता. त्या तुलनेत रविवारी अंशत: दिलासा मिळाला. मागील तीन ते चार दिवसांपासून शहराचे किमान तापमान १५ अंशांच्या जवळपास स्थिरावत होते; मात्र शुक्रवारपासून किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. नाशिककरांना कडाक्याची थंडी जाणवू लागली. शहरासह निफाड व मालेगाव तालुकादेखील चांगलाच गारठला आहे. मालेगावात ११.८ अंश इतके किमान तापमान रविवारी नोंदविले गेले.