गंगापूर : गंगापूर, गोवर्धन परिसरातील कोंडवाडे नामशेष झाल्यामुळे ग्रामीण भागात मोकाट जनावरांचा वावर आणि उपद्रव वाढला आहे याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शहरी व ग्रामीण भागात पशुधन मोठ्या वाढत असल्याने मोकाट जनावरे बाजारपेठेत व मुख्य रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने नागरिकांना आपली वाहने चालवणे मोठ्या जिकरीचे झाले आहे. जोपर्यंत एखादा अपघात होत नाही तोपर्यंत त्यांचे मालक अदृश्य असतात, मात्र जनावराला अपघात झाल्यास मालक आर्थिक भरपाईसाठी पुढे सरसावतात. महापालिका अथवा गोवर्धन ग्रामपंचायत या जनावरांना पकडून कोंडवाड्यात सोडण्याची व मालकांना दंड करण्याची तसदी घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याचे अनेक उदाहरणे आहेत. याला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतींकडून जनावरांना बंदिस्त करण्यासाठी कोंडवाड्याची निर्मिती केली पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहे. गंगापूररोड, आनंदवल्ली, सोमेश्वर, गंगापूर, गोवर्धन या ठिकाणी रस्त्यावर मोकाट जनावरे बसल्याने रस्त्यावरील वाहनचालकांना जीव मुठीत धरावा लागत आहे.
गंगापूरला मोकाट जनावरांचे कोंडवाडे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:54 IST