Nashik Crime: पंचवटीत काही वर्षापूर्वी नवनाथनगर येथील पेठरोड भागात घडलेल्या निकम खून प्रकरणाच्या पूर्ववैमनस्यातून दोन टोळीत गंगवार सुरु झाला असून, त्यातूनच दोघा तडीपार संशयितांनी एका गुन्हेगारावर बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास राहुलवाडीत घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाच्या मानेत गोळी अडकल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर गोळीबार करणारे तिघे संशयित दुचाकीवरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे..
सागर विठ्ठल जाधव असे गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेबाबत राहूलवाडी समाजमंदिर येथे राहणाऱ्या योगेश वाघमारे यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यावरून संशयित तडीपार आरोपी विकी उत्तम वाघ, विकास उर्फ विकी विनोद वाघ व इतरांवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार या परिसरातील बाळू वाघमारे याचे निधन झाल्याने सागर त्यांच्या अंत्यविधीसाठी योगेश वाघमारे याच्यासह आला होता. अंत्यविधी झाल्यानंतर जाधव हा वाघमारे यांच्याकडे मुक्कामी थांबला होता. रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास मानलेली बहीण मंगला भवर हिच्या घराबाहेरील ओट्यावर बसून सागर जाधव आणि योगेश हे गप्पा मारत बसले होते. रात्री १ वाजता शेजारच्या गल्लीतून दोन्ही विकींसह इतर संशयित आले. त्यावेळी विकी वाघने हाच सागर जाधव असे म्हणत तरुणाकडे बोट दाखविले. त्यावेळी दुसऱ्या विकीनेत्याच्या कमरेला लावलेली बंदूक काढून एक गोळी सागर याच्या डाव्या गालावर मारली. ती गोळी डोळ्याच्या खाली लागली व मानेत अडकली. त्यानंतर वाघने पुन्हा दुसरी गोळी झाडली, मात्र नेम चुकला. गोळी लागल्यानंतर सागर घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर दोघे वाघ व इतर संशयित दुचाकीवरून फरार झाले.
गोळीबाराचा आवाज ऐकून रोहित वाघमारे, प्रतीक वाघमारे, साहिल वाघमारे व मंगला भवर हे घराबाहेर आले आणि त्यांनी सागरला दुचाकीवरून रुग्णालयात दाखल केले. सागरवर सध्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही वर्षापूर्वी २०१७ मध्ये किरण निकम याची निघृण हत्या करण्यात आली होती. त्या घटनेतील फरार विकी पंजाबी याला काही दिवसांपूर्वी गुंडाविरोधी पथकाने परराज्यातून अटक केली होती. या प्रकारानंतर निकम व उफाडे टोळीतील वाद आणखीच वाढले. त्यातून ही घटना घडली. निकम खून प्रकरणात जखमी सागर जाधव हादेखील होता. त्याचाच वचपा काढण्यासाठी संशयित वाघ यांनी रात्रीच्या वेळी गोळीबार करून जाधवला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, विकी उत्तम वाघ याच्यावर अकरा चोरी, दोन जबरी लूट, दोन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, तर विकी विनोद वाघ याच्यावर एक खून, दोन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न व इतरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. गंभीर गुन्हे दाखल असल्याने विकी विनोद वाघ तसेच विकी उत्तम वाघ या दोघांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे.