नाशिकमधून वाळूच्या गाड्या पळवून नेणा-यांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:38 IST2018-02-19T17:35:58+5:302018-02-19T17:38:20+5:30
शासनाच्या महसुल वसुलीसाठी बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक करणा-यांविरूद्ध महसुल प्रशासनाने मोहिम हाती घेतली असून, तलाठी, मंडळ अधिका-यांचे पथके गठीत करण्यात आली आहेत. नाशिक शहरात पर जिल्ह्यातून चोरी, छुपी मार्गाने येणा-या वाळू वाहतुक करणा-या गाड्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर पाच पट दंडात्मक कारावाई केली

नाशिकमधून वाळूच्या गाड्या पळवून नेणा-यांविरूद्ध गुन्हा
नाशिक : महसूल अधिका-यांच्या पथकाने बेकायदा वाळू वाहतूक करणा-या पकडून आणलेल्या तीन गाड्या दंड न भरताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून परस्पर पळवून नेल्या प्रकरणी अखेर नाशिक तहसिल कार्यालयाने चौघा वाळू माफियांविरूद्ध सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली आहे. शासकीय जागेतून परस्पर वाहन पळविल्याच्या प्रकारामुळे प्रशासन सतर्क झाले असून, यापुढे कार्यालयातून बाहेर पडणा-या गौणखनिजाच्या गाडी चालकाकडे दंड भरल्याची पावती पाहिल्याशिवाय गाडी बाहेर पडू न देण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाच्या महसुल वसुलीसाठी बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक करणा-यांविरूद्ध महसुल प्रशासनाने मोहिम हाती घेतली असून, तलाठी, मंडळ अधिका-यांचे पथके गठीत करण्यात आली आहेत. नाशिक शहरात पर जिल्ह्यातून चोरी, छुपी मार्गाने येणा-या वाळू वाहतुक करणा-या गाड्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर पाच पट दंडात्मक कारावाई केली जात आहे. गेल्या सोमवारी तलाठी व मंडळ अधिका-यांनी पकडून आणलेल्या तीन मालट्रक (क्रमांक एम. एच. ०४ एफक्यु ४०८२ व एम. एच. ०४ एफडी ८७०३; एम. एम. १५ डी. के. ६३३१) नाशिक तहसिलदार कार्यालयाच्या बाहेर उभ्या केल्या असता दोन दिवसांनी दोन्ही मालट्रक आवारातून गायब झाल्याचे उघडकीस आले. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत शनिवारी अखेर नाशिक तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार अरूण शेवाळे यांनी सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली आहे. सुमारे सव्वा सहा लाख रूपये किंमतीच्या तीन मालट्रक अंबादास भागवत सदगिर रा. शिंदे, सुरेश चंदर भोईर, दत्ता मुरलीधर माने, भरत मोतीराम नवले रा. सारूळ ता. नाशिक या चौघांनी पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वाळू माफियांच्या या अभिनव दादागिरीची दखल घेत प्रशासनाने आता आणखी कडक भुमिका घेण्याचा निर्णय घेतला असून, एकदा पकडून आणलेली गाडी तहसिल कार्यालयाच्या अवारात आणून उभी केल्यानंतर ज्या वेळी ती कार्यालयातून बाहेर पडेल त्यावेळी गाडी चालकाकडून दंड भरल्याची पावती तपासूनच गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.