मंजूर नसलेल्या पदांवर डॉक्टरांच्या भरतीचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:19 IST2018-11-23T23:59:26+5:302018-11-24T00:19:47+5:30
नाशिक : किडनी, कॅन्सर व हृदयरोग या गंभीर आजारांवर गोरगरिबांना नाममात्र दरात उपचार घेता यावे यासाठीच कोट्यवधी रुपये खर्च ...

मंजूर नसलेल्या पदांवर डॉक्टरांच्या भरतीचा खेळ
नाशिक : किडनी, कॅन्सर व हृदयरोग या गंभीर आजारांवर गोरगरिबांना नाममात्र दरात उपचार घेता यावे यासाठीच कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील अनागोंदी कारभारातील गंभीर बाबी दिवसाआड उघडकीस येत असून, हाड, स्त्रीरोग व बालरोगावर या रुग्णालयात उपचाराची पुरेशी व्यवस्था व त्यासाठी तज्ज्ञांची पदे मंजूर नसतानाही गेल्या काही वर्षांपासून या पदांसाठी डॉक्टरांची भरती करण्याचा व त्यांच्या वेतनावर दरमहा लाखो रुपये खर्ची पाडण्याचा प्रकार माहिती अधिकारातून स्पष्ट झाला आहे. मंजूर नसलेली पदे भरण्यामागची कारणे समजू शकली नसली तरी, त्यातून शासनाचीच अप्रत्यक्ष फसवणूक करण्यात आल्याचे उघड उघड दिसू लागले आहे.
गोरगरिब रुग्णांवर मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन महागडे उपचार करण्याची वेळ येऊ नये यासाठीच नाशकात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय उभारण्यात आले. विशेष करून कॅन्सर, हृदयरोग व किडनी यांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी रुग्णालयात अत्याधुनिक साधन सामग्री व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून, उपचारात कोठेही कमतरता राहू नये, यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ खासगी डॉक्टरांचीही मदत घेतली जात असल्याने अनेक रुग्णांना आजवर जीवदान मिळाले आहे. अन्य आजारांवर उपचारासाठी शासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था बळकट केल्यामुळे याठिकाणी सर्व प्रकारच्या आजारांवर नियमित निदान व उपचार केले जात आहेत. असे असतानाही विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अस्थिरोग, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची नेमणूक करण्यामागचे कोडे या क्षेत्रातील जाणकारांना अजूनही उलगडलेले नाही.
अलीकडेच विचारलेल्या माहिती अधिकारात संदर्भ सेवेने दिलेल्या लेखी उत्तरात रुग्णालयात अस्थिव्यंगोपचार, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञांची पदे मंजूर नसल्याचे म्हटले आहे. ही पदेच मंजूर नसल्यामुळे या पदांवरील नियुक्त केलेल्या डॉक्टरांनी किती रुग्णांवर आजवर उपचार केले व किती रुग्ण बरे होऊन घरी गेले याची माहितीही रुग्णालयाकडे नसल्याचा छातीठोक दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र गेल्या सात वर्षांपासून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. खिरारी, पाच वर्षांपासून अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजय कुटे व सहा वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ डॉ. कांचन यांची रुग्णालय व्यवस्थापनाने नियुक्ती केली आहे व ते आजही त्यांची सेवा (?) रुग्णालयात येणाºया रुग्णांना देत आहेत.
लाखो रुपयांचे पॅकेज देण्याचा पायंडा
विशेष म्हणजे अस्थिरोगावर उपचाराची कोणतीही आवश्यक व पुरेशी साधने रुग्णालयात नसतानाही अस्थिरोग तज्ज्ञ गेल्या पाच वर्षांपासून रुग्णांची सेवा करीत असल्याची बाब अधिकच आश्चर्यकारक मानली जात असून, रुग्णालयाचे विद्यमान वैद्यकीय अधीक्षक स्वत: अस्थिरोगतज्ज्ञ असूनही सदरचे पद भरण्याचे कारणच काय, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एकीकडे पदे मंजूर नसल्याची कबुली द्यायची व दुसरीकडे तज्ज्ञांची नियुक्ती करून त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज देण्याचा पायंडा संदर्भ सेवा रुग्णालयाने पाडून एकप्रकारे त्या माध्यमातून शासनाची फसवणूकच केल्याचे मानले जात आहे.
आरोग्य संचालकांचे दुर्लक्ष
पदे मंजूर नसणे व रुग्णालयात पुरेशा उपचाराची व्यवस्था नसूनही अस्थिरोग, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची संदर्भ सेवा रुग्णालयात भरती करण्याच्या या गंभीर प्रकाराबाबत आरोग्य संचालकांनाही अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. बुधवारी आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी संदर्भ सेवा रुग्णालयाच्या झाडाझडतीतही सदरचा प्रकार त्यांच्या निदर्शनास न येऊ देण्याची तजवीज घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.