जिल्हा क्रीडा संकुलासाठी पाच कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 01:21 IST2021-07-02T01:20:49+5:302021-07-02T01:21:12+5:30
देवळाली विधानसभा मतदारसंघातील सय्यद पिंपरी येथील प्रस्तावित असलेल्या १५ कोटींच्या क्रीडा संकुलाच्या कामासाठी ५ कोटी निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार असून, क्रीडा संकुलाचे काम सुरू झाल्यानंतर उर्वरित निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

जिल्हा क्रीडा संकुलासाठी पाच कोटींचा निधी
नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघातील सय्यद पिंपरी येथील प्रस्तावित असलेल्या १५ कोटींच्या क्रीडा संकुलाच्या कामासाठी ५ कोटी निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार असून, क्रीडा संकुलाचे काम सुरू झाल्यानंतर उर्वरित निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार यांनी, आरोग्य विभागात कोरोना काळात निधीची कमतरता पडू नये यासाठी अधिवेशनात ३०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून अन्न व नागरी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग या विभागांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. त्याचप्रमाणे देशात सर्वात जास्त लसीकरण राज्यात झाले आहे. यापुढेही जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी हाफकीन या संस्थेला लस निर्मितीसाठी मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले, त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन देऊन शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचाच वारसा घेऊन शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा व त्यांची फसवणूक होणार नाही यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी असून त्यांना न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी, स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी खेड्यापाड्यात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कृषीक्षेत्रात मोलाचे योगदान देऊन कृषी क्रांती घडविली आहे. त्यामुळे आज आपला देश जगभरात शेतमालाची निर्यात करणारा महत्त्वपूर्ण देश बनला आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा वारसा पुढे सुरू ठेवून जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी भरीव योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात अतिशय सुंदर क्रीडा संकुल उभे राहत असून यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे, असेही भुजबळ म्हणाले. यावेळी आ. सरोज अहिरे, दिलीप बनकर, नितीन पवार, माजी खा. देवीदास पिंगळे, माजी आ. जयंत जाधव, सय्यद पिंपरी गावचे सरपंच मधुकर ढिकले आदी उपस्थित होते.