फंडींगसाठीची मोर्चेबांधणी आली कामाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:59+5:302021-02-05T05:45:59+5:30
नाशिक : नाशकात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या फंडींगसाठी आयोजकांकडून करण्यात आलेली मोर्चेबांधणी कामी आल्याने लोकहितवादी मंडळाच्या धुरिणांनी उपाध्यक्षपदांवर तसेच सल्लागार ...

फंडींगसाठीची मोर्चेबांधणी आली कामाला !
नाशिक : नाशकात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या फंडींगसाठी आयोजकांकडून करण्यात आलेली मोर्चेबांधणी कामी आल्याने लोकहितवादी मंडळाच्या धुरिणांनी उपाध्यक्षपदांवर तसेच सल्लागार समित्यांमध्ये केलेली महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेतृत्वाची नियुक्ती उपयुक्त ठरल्याच्या चर्चेला त्यामुळे बहर आला आहे.
नाशिकचे साहित्य संमेलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार असल्याने या संमेलनाला गर्दीदेखील कमी हाेईल, त्यामुळे खर्चदेखील कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन या संमेलनासाठी निर्धारित ५० लाखांऐवजी केवळ ३३ टक्के म्हणजेच केवळ १७ लाख रुपयांचे अनुदान मिळेल, अशी चर्चा साहित्य संमेलनाच्या आयोजनापूर्वीपासून होती. त्यामुळेच कमी अनुदानात संमेलन भरविण्यासाठी फारसे कुणी इच्छुक नव्हते. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये साहित्य संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिककरांच्या निर्णयाला धाडसी म्हटले होते. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या लोकहितवादी मंडळाने संमेलन आयोजनाचा प्रस्ताव देण्यापासूनच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजळ यांना या बाबींची कल्पना देऊन संमेलनाच्या पूर्ण अनुदानासाठी आग्रही राहण्याची विनंती केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राष्ट्रवादीचे खजिनदार असलेले माजी आमदार हेमंत टकले हेच लोकहितवादीचे विश्वस्त असल्याने पूर्ण अनुदानाच्या लॉबिंगला त्यांचादेखील हातभार लागला असणार. तसेच संमेलनाची कार्यकारिणी जाहीर करताना लोकहितवादी मंडळाने स्वागताध्यक्षपदी भुजबळ, तर उपाध्यक्षपदांवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसेच कृषिमंत्री दादा भुसे यांचीदेखील वर्णी लावून फंडींगसाठी चारही बाजूने केलेली कडेकोट सज्जता कामी आल्याचेच यामुळे दिसून येत आहे.
इन्फो
अडीच कोटींची तयारी
साहित्य संमेलनासाठीच्या खर्चात विविध कारणांनी वाढ झाली तरी सर्व प्रकारची सज्जता असावी, यासाठी किमान सव्वादोन ते अडीच कोटी रुपयांची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठीच सल्लागार आणि मार्गदर्शक समितीमध्ये अखेरच्या क्षणी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची तजवीज करण्यात आली आहे. त्याशिवाय नाशिक महानगरपालिकेकडे ५० लाखांची मागणी करण्यात आली आहे. तर जिल्हा परिषदेकडूनही निधीसाठी प्रयत्न सुरू असून जिल्ह्याच्या निर्मितीला १५१ वर्षे झाल्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडूनदेखील निधी मिळू शकतो का, यासाठीदेखील आयोजकांचे प्रयत्न सुुरू आहेत.
इन्फो
स्वागत समितीतूनही निधी उभारणी
गतवर्षापर्यंतच्या साहित्य संमेलनात ज्या स्वागत समितीमधील सदस्यत्वाचे मूल्य दोन हजार रुपये होते, त्यातदेखील यंदा अडीच पट वाढ करुन ते ५ हजार रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे स्वागत समितीच्या माध्यमातून तसेच स्थानिक दानशूर आणि रसिकांच्या माध्यमातूनही निधी उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे.