नाशिक शहरात शुक्रवारची नमाज आटोपशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 20:32 IST2020-03-20T20:31:20+5:302020-03-20T20:32:52+5:30
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, शासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केल्याने शुक्रवारी (दि.२०) शहरातील मशिदींमधील ‘जुम्मा’निमित्ताचे करण्यात येणारे दुपारची नमाजपठण आटोपशीर करण्यात आली. ‘

नाशिक शहरात शुक्रवारची नमाज आटोपशीर
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना प्रतिसाद म्हणून शुक्रवारी शहरातील मुस्लिम धर्मियांनी नमाज आटोपशीर घेतली. त्याच बरोबर धर्मगुरूंचे प्रवचनाचा वेळही कमी करण्यात येवून प्रत्येकाला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, शासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केल्याने शुक्रवारी (दि.२०) शहरातील मशिदींमधील ‘जुम्मा’निमित्ताचे करण्यात येणारे दुपारची नमाजपठण आटोपशीर करण्यात आली. ‘जुम्मा’च्या नमाजला विशेष महत्त्व असल्याने होणारी गर्दी विचारात घेता नमाजपठणाचा अवधी कमी करण्यात आला. कुराणातील लहान सुरहांचे (श्लोक) पठण यावेळी करण्यात आले. शिवाय धर्मगुरुंच्या प्रवचनाची वेळ देखील कमी करण्यात आली. त्यामुळे एरवीपेक्षा वीस ते पंचवीस मिनिटे नमाजपठण लवकर संपले. नमाजापूर्वी शुचिर्भूत (वजू) झाल्यानंतर सामुहिकरित्या टॉवेलचा वापर होऊ नये म्हणून मशिदीत टॉवेल ठेवण्यात आले नव्हते. प्रत्येकाने आपापले स्वतंत्र टॉवेल आणण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले होते. यानुसार मुस्लिम बांधवांनी वजुखान्यात वैयक्तिक टॉवेल वापरले. प्रत्येक नमाज पठणापूर्वी वजुखान्यात तोंड, हात-पाय धुवून मशिदीत प्रवेश केला जातो. यावेळी सामुहिक टॉवेल वापरण्यात येतो. मात्र, कोरोनाच्या संसगार्मुळे यंदा सामुहिक टॉवेल बंदी करण्यात आली. तसेच नमाज पठणापूर्वी प्रत्येक मशिदीत डेटॉलने स्वच्छता करण्यात आली. यावेळी दुवा पठणाचाही वेळ कमी करण्यात आल्याने नमाजपठण लवकर संपले. पुढील टप्प्यात शहरातल्या लहान-मोठ्या मशिदींमध्ये दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये होणाऱ्या पाचवेळा नमाजपठणाचाही कालावधी कमी करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, इस्लामच्या शिकवणीनुसार तुम्ही अंत:करणाने आणि शरीराने स्वच्छ असतात, तेव्हा तुमची उपासना साध्य होते. सध्या करोना विषाणू संसगार्चा प्रादूर्भाव वाढल्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेवर विशेष लक्ष देणे आवश्यक असून, आरोग्याच्या संदर्भात तक्रारी जाणविल्यास खबरदारी घ्यावी. तसेच निरामय आरोग्यासाठी स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुस्लिम धर्मगुरुंनी 'जुम्मा'च्या नमाजपठणानंतरच्या प्रवचनात केले.