फळभाज्यांची आवक स्थिर; बाजारभाव टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:25 IST2019-07-02T00:25:08+5:302019-07-02T00:25:30+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक स्थिर असून, बाजारभावदेखील टिकून आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचा विशेष कोणताही परिणाम बाजारभाव तसेच आवकवर झालेला नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

फळभाज्यांची आवक स्थिर; बाजारभाव टिकून
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक स्थिर असून, बाजारभावदेखील टिकून आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचा विशेष कोणताही परिणाम बाजारभाव तसेच आवकवर झालेला नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
बाजार समितीत कारले, काकडी, शिमला मिरची, लाल वांगे, लामडी वांगे, भरताचे वांगे, दोडका तसेच भेंडी, टमाटा, गिलका या फळभाज्यांचा शेतमाल विक्रीसाठी दाखल होत आहे. सर्वच फळभाज्यांत दोडक्याला सर्वाधिक बाजारभाव असून, सर्वांत कमी बाजारभाव भोपळ्याला मिळत आहे. १५ किलो वजनाच्या दोडका जाळीला ७५० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे, तर भोपळा प्रतिनग ८ रुपये दराने विक्री होत आहे. याशिवाय गेल्या आठवड्यात कारली ५५० रुपये जाळी दराने विक्री झाली होेती. त्यात आता जवळपास ५० ते ६० रुपयांनी घसरण होऊन ४८० रुपयांपर्यंत बाजारभाव आले आहेत.
२० किलो वजनी जाळी असलेल्या गावठी हिरव्या काकडीला गेल्या आठवड्यात ७०० रुपये असा बाजारभाव मिळाला होता. शिमला मिरची २० रुपये, भेंडी २५ रुपये किलो, टमाटा १५ रुपये, लामडी वांगी १५ तर भरताचे वांगे २० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.