जानेवारी २०२० पासून स्मार्टकार्डवरच मोफत बसप्रवास: दिवाकर रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:01 IST2019-07-14T23:12:19+5:302019-07-15T01:01:39+5:30
ज्येष्ठ नागरिकांना बसप्रवास भाड्यातील सवलतीसाठी येत्या ३१ डिसेंबरपर्यंतच आधारकार्डचा उपयोग होईल. दि. १ जानेवारी २०२० पासून नवीन स्मार्टकार्ड दाखवावे लागेल, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.

जानेवारी २०२० पासून स्मार्टकार्डवरच मोफत बसप्रवास: दिवाकर रावते
त्र्यंबकेश्वर : ज्येष्ठ नागरिकांना बसप्रवास भाड्यातील सवलतीसाठी येत्या ३१ डिसेंबरपर्यंतच आधारकार्डचा उपयोग होईल. दि. १ जानेवारी २०२० पासून नवीन स्मार्टकार्ड दाखवावे लागेल, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. एका कार्यक्रमानिमित्त ते त्र्यंबकेश्व येथे आले होते. स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या मोफत पाससंदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.
मुलाचा धार्मिक विधी करण्यासाठी रावते परिवारासह त्र्यंबकेश्वर येथे आले होते. यावेळी त्यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतल्यानंतर देवस्थान कार्यालयात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून स्मार्टकार्डधारकाला सुमारे चार हजार किलोमीटरचा बसप्रवास मोफत करता येतो. यासंदर्भात नागरिकांनी
तक्र ारी मांडताना सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना भाडे सवलतीचे कार्ड मिळविण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते. कार्ड काढण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या ५५
रुपयांऐवजी जास्त पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
मंदिराचे विश्वस्त संतोष कदम, शिवसेना शहर संपर्कप्रमुख भूषण अडसरे, भाजपचे शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नंदकुमार कदम, कल्पेश कदम, प्रशांत बागडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरला येणाºया भाविकांची संख्या मोठी असल्याने जादा बसगाड्यांची व्यवस्था करावी तसेच रोज सायंकाळी त्र्यंंबकहून नाशिकला जाण्यासाठी बसची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली. याबाबत दखल घेऊन सायंकाळी मुक्कामाच्या जादा गाड्या सोडल्या जातील. आणि सकाळी ठरावीक वेळेच्या अंतराने बस सोडल्या जातील, असे आश्वासन रावते यांनी यावेळी दिले.
दरम्यान, दिवाकर रावते यांचे मराठी भाषेवरील प्रेम प्रत्ययास आले. पूजाविधी संपल्यानंतर देवतांची आरती करण्यात आली. ब्राह्मणवर्गाने गुजराथी भाषेतून शंकराची आरती म्हणण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी, रामदास स्वामींनी सर्व देवतांच्या आरत्या मराठी भाषेतून रचल्या आहेत. तर तुम्ही गुजराथी भाषेतील आरती का म्हणता असा प्रश्न करत स्वत: लवथवती विक्र ाळा ही आरती म्हणत पूजाविधी पूर्ण केला.
स्मार्टकार्डसाठी आधारकार्ड, मतदानकार्ड पाहून त्यांची नोंद करून व संपूर्ण माहिती भरावी लागते. त्यामुळे थोडाफार वेळ तर लागणारच. हे काम खासगी कंपनीला दिले आहे. त्यामुळे त्यांनी जादा पैसे मागितले तर याबाबतीत त्यांना सूचना देऊ. यासाठी पीआरओची नियुक्ती केली आहे. याशिवाय ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. १ जानेवारी २०२० पासून मात्र स्मार्टकार्डवरच मोफत प्रवास करता येणार आहे. आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे रावते यांनी यावेळी सांगितले.