भोंदू बाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; अवघ्या ५ मिनिटांत झाली सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:03 IST2026-04-01T12:03:03+5:302026-04-01T12:03:03+5:30
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले

भोंदू बाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; अवघ्या ५ मिनिटांत झाली सुनावणी
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात बुधवारी ताजी अपडेट आली आहे. राज्यभरात खळबळ उडवून दिलेला नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत होता. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाची व्याप्ती आणि चर्चा पाहता, प्रचंड पोलिस बंदोबस्तात खरातला कोर्टात आणण्यात आले आणि अवघ्या पाच मिनिटांत सुनावणी होऊन त्याला कोर्टाबाहेर नेण्यात आले.
न्यायालयात काय-काय घडलं?
न्यायाधीश श्रीमती बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात अशोक खरातला हजर करण्यात आले. तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी कोर्टरूममध्ये दाखल झाले. सरकारी वकील शैलेंद्र बागडेही हजर झाले. आधी सरकारी वकीलांच्या युक्तीवादाला सुरूवात झाली. न्यायाधीशांनी काही कागदपत्रे तपासली आणि तपास अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ही शिक्षा पहिल्या गुन्ह्यासाठी देण्यात आली. आता उद्या पुन्हा त्याला दुसऱ्या गुन्ह्या संदर्भातील सुनावणीसाठी कोर्टात हजर केले जाणार आहे. आज कोणताही युक्तिवाद झाला नाही.
खरातची पत्नी फरार
अशोक खरातची विशेष तपास पथकाद्वारे (SIT) सखोल चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान तो चार वेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याचे समोर आले. या मोबाईलमधील माहितीवरून अनेक धक्कादायक उलगडे होण्याची शक्यता आहे. अशोक खरातच्या या कृत्यात त्याची पत्नी कल्पना खरात हिचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या ती फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. तिलाही लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरातच्या अटकेमुळे नाशिकमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या दोन बड्या नेत्यांची नावे चर्चेत आल्याने अनेक राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत.
खरातने घातला लाखोंचा गंडा
भोंदूगिरी करून, अघोरी विद्या किंवा दैवी शक्तीचा दावा करून खरातने अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचा आरोप आहे. पहिल्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा मुक्काम आता कारागृहात असणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अत्यंत गांभीर्याने करत असून, खरातने आणखी कोणाकोणाची फसवणूक केली आहे, याचे पुरावे गोळा केले जात आहेत. अंधश्रद्धेला बळी पडू नका, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.