सायबराबादच्या व्यक्तीची नाशकातून १८ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 01:50 IST2022-03-12T01:50:10+5:302022-03-12T01:50:31+5:30
फॅन्सी मोबाइल नंबर देण्याच्या बहाण्याने तेलंगणातील सायबराबाद येथील नागरिकाला १८ लाख ८९ हजार रुपयांना गंडवणाऱ्या नाशिकमधील कुणाल खैरनार व हेमंत राजेंद्र ओसवाल दाेघांना नाशिक शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

सायबराबादच्या व्यक्तीची नाशकातून १८ लाखांची फसवणूक
नाशिक : फॅन्सी मोबाइल नंबर देण्याच्या बहाण्याने तेलंगणातील सायबराबाद येथील नागरिकाला १८ लाख ८९ हजार रुपयांना गंडवणाऱ्या नाशिकमधील कुणाल खैरनार व हेमंत राजेंद्र ओसवाल दाेघांना नाशिक शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कुणाल राजेंद्र खैरनार (३५, रा. मीनाक्षी हाइटस्, बडदे नगर, शिवाजी चौक, सिडको) व हेमंत राजेंद्र ओसवाल (रा. भोजनाई पार्क, ए, हिरावाडीरोड, नवीन आडगाव नाका, पंचवटी) या दोघांनी तेलंगणातील सायराबाद येथील एका व्यक्तीची १८ लाख ८९ हजार रुपयांची फसणूक केली होती. या प्रकरणात सायबराबाद शहरातील सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याच्या तपासासाठी सायबराबाद पोलीस नाशिक शहरात आले होते. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविण्यात आला होता. या पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यातील संशयितांचा हैदराबाद पोलिसांसह गोपनीय माहितीद्वारे शोध घेतला असता संशयित पंचवटी व सिडकाेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित कुणाल खैरनार व हेमंत राजेंद्र ओसवाल यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने १८ लाख ८९ हजार रुपये उकळल्याची कबुली दिली असून, दाेघांनाही सायबराबाद पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.