माजी आमदार कोतवाल यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 18:18 IST2022-04-18T18:17:59+5:302022-04-18T18:18:57+5:30
चांदवड : घरकुल योजनेतील वंचित लाभार्थींना घरकुलांचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी येथील नगरपरिषद कार्यालयासमोर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी सोमवारी (दि. १८) सकाळी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

चांदवड येथील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषणास बसलेले माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्याशी चर्चा करताना मुख्याधिकारी अभिजित कदम. समवेत भारती देशमुख, विलास पवार, नवनाथ आहेर, वाहीद पठाण, महावीर संकलेचा आदींसह अदिवासी बांधव.
चांदवड : घरकुल योजनेतील वंचित लाभार्थींना घरकुलांचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी येथील नगरपरिषद कार्यालयासमोर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी सोमवारी (दि. १८) सकाळी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
आमरण उपोषणात कोतवाल यांच्यासमवेत माजी नगरसेवक ॲड. नवनाथ आहेर, सुनील कबाडे, अनिल कोतवाल, कैलास कोतवाल, विलास पवार, आदित्य फलके, राहुल कोतवाल, मंजूर घासी, भारती देशमुख, किरण वाघ, वाहीद पठाण, भिकचंद व्यवहारे, गणेश खैरनार, जाकीर शहा, राजू बिरार, विजय सांबर, गोकुळ देवरे, भरत माळी, संभाजी सोनवणे, महावीर संकलेचा, राजाभाऊ आहिरे, आनंद बनकर आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोतवाल यांनी यापूर्वीच उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देत नगरपरिषद हद्दीतील मूलभूत व नागरी सुविधांचा अभाव तसेच शासकीय योजना राबविण्यात नगरपरिषद प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अनेक लाभार्थींना वंचित ठेवले जात असल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत उपोषणाचाही इशारा देण्यात आला होता; परंतु त्याची दखल न घेतल्याने अखेर कोतवालांनी उपोषणाचे हत्यार उपसले.
सन २०१८-१९ या कालावधीत सर्वच प्रवर्गातील गरीब व्यक्तींनी घरकुले मिळण्यासाठी केलेले अर्ज नगरपरिषदेकडे प्राप्त झालेले असताना अवघ्या १२० व्यक्तींना घरकुले मंजूर होऊन घरकुलांची कामे करण्यास सुरुवात झाली. शहरातील अजूनही असंख्य गरीब रहिवासी कच्च्या घरात राहत आहेत. परंतु यात अनेक लाभार्थींची घरकुलाची कामे सुरू केल्यानंतर सदरची कामे निधीअभावी अर्धवट स्थितीत आहेत. नवीन घरकुल योजनेचा डीपीआर अद्याप शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला नसल्याची तक्रारही कोतवाल यांनी केली आहे. याशिवाय त्यांनी शहरातील मूलभूत प्रश्नांकडेही लक्ष वेधले होते.