सिडकोची घरे फ्री होल्ड मागणीचा पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:20 IST2019-05-25T00:20:40+5:302019-05-25T00:20:58+5:30
सिडकोची ९९ वर्षांच्या कराराने दिलेली घरे फ्री होल्ड (मालकी हक्क) करण्याची सिडकोवासीयांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती.

सिडकोची घरे फ्री होल्ड मागणीचा पाठपुरावा
सिडको : सिडकोची ९९ वर्षांच्या कराराने दिलेली घरे फ्री होल्ड (मालकी हक्क) करण्याची सिडकोवासीयांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या मागणीचा विचार करता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सीमा हिरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून सिडकोची घरे फ्री होल्ड करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.
गेल्या दि. २० डिसेंबर २०१८ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात सिडको फ्रीहोल्ड करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याबाबतचा शासन आदेश नाशिक येथील सिडको प्रशासकीय कार्यालयास अप्राप्त असल्याने सिडकोची घरे हस्तांतरण, बांधकाम परवानगी, लीज डीड यांसारखी कामे करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे आमदार हिरे यांनी सांगितले.
तसेच मंगळवारी (दि. २१) मुंबई येथे लोकसभा निवडणूक आढावा बैठकीदरम्यान हिरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन नाशिक येथील सिडको फ्रीहोल्डचा निर्णय दि. २० डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेला होता. परंतु त्याबाबतचा अध्यादेश सिडको प्रशासकीय कार्यालयास अद्याप प्राप्त झाला नसल्याने सिडको फ्रीहोल्डनुसार नागरिकांना द्यावयाच्या सुविधा, सवलती यांबाबतची कार्यवाही प्रशासनाला करता येऊ शकलेली नसल्याने सिडकोतील नागरिकांचे मिळकत हस्तांतरण, बांधकाम परवानगी व तत्सम कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
तरी सिडको फ्रीहोल्ड अंमलबजावणीचा अध्यादेश त्वरित काढण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधिताना सूचना देण्यात याव्यात, अशी चर्चा निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
सिडकोची ९९ वर्षांच्या कराराने दिलेली घरे फ्री होल्ड (मालकी हक्क) करण्याची सिडकोवासीयांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. आचारसंहिता संपताच याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले.