लोकहितवादी मंडळातर्फे रंगकर्मींचा सत्कार
By Admin | Updated: August 3, 2015 00:21 IST2015-08-03T00:18:39+5:302015-08-03T00:21:11+5:30
लोकहितवादी मंडळातर्फे रंगकर्मींचा सत्कार

लोकहितवादी मंडळातर्फे रंगकर्मींचा सत्कार
नाशिक : लोकहितवादी मंडळातर्फे गेल्या अडीच वर्षांत सादर करण्यात आलेल्या नाटकातून विविध स्पर्धेत यश मिळविणाऱ्या सुमारे दीडशे कलावंतांचा शनिवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. नवीन लेखकांनी समाजातील समस्या नाटकातून मांडाव्यात, तसेच रंगकर्मींनी त्या दर्जेदार पद्धतीने अभ्यासपूर्वक सादर कराव्यात, असे आवाहन यावेळी उपस्थित असलेले लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त, आमदार हेमंत टकले यांनी सत्कारार्थी रंगकर्मींना केले. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, उपमहापौर गुरुमित बग्गा, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, मंडळाचे विश्वस्त दिलीप साळवेकर, मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आदि मान्यवर उपस्थित होते.
गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत मंडळाने सादर केलेल्या नाटकांना सुमारे ५५ बक्षिसे मिळविली. यंदाच्या राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत मंडळाने सादर केलेल्या न हि वरैन वैरानी या नाटकाला अभूतपूर्व यश मिळाले, तसेच गेल्या तीन वर्षांत मराठीसह हिंदी व संस्कृत नाटकांत मंडळाच्या कलावंतांनी मिळविलेल्या यशाचा यथोचित गौरव होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा या दिल्ली येथील नाट्यप्रशिक्षण संस्थेत निवड झालेल्या पूजा वेदविख्यात हिचा आमदार टकले यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. पथनाट्याच्या माध्यमातूनही सामाजिक विषय मांडले जावेत, नाटकांबरोबर पथनाट्यांचेही सादरीकरण केले जावेत, अशी अपेक्षा यावेळी आमदर टकले यांनी व्यक्त केली.
मंडळाने सादर केलेल्या न हि वैरन वैरानी, कुस बदलताना (मराठी), बदलती करवटे व अंधेर नगरी चौपट राजा (हिंंदी), तिमीर सम्राट (संस्कृत) या नाटकांचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, प्रकाश योजनाकार, नेपथ्यकार, पार्श्वसंगीतकार तसेच नाटकांची निर्मिती करण्यासाठी मदत करणारे पडद्यामागील कलावंत अशा सुमारे दीडशे रंगकर्मींना यावेळी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यात ५ वर्षे वयाच्या मुलांपासून ते ६५ वर्षे वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता.
न हि वैरेन वैरानीचे यश गेल्या ५४ वर्षांत महाराष्ट्र राज्यातील हौशी मराठी नाटकांमध्ये सर्वाेत्कृष्ट नाटकांसह ९ प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळवून नाशिकसाठी ऐतिहासिक विजय नोंदविणारे न हि वैरेन वैरानी हे एकमेव नाटक आहे. लोकहितवादी मंडळाने या नाटकाचे सादरीकरण केले याचा अभिमान वाटतो, तसेच तात्यासाहेब शिरवाडकर यांनी १९५० साली ज्या विचारांनी या मंडळाची स्थापना केली, त्या विचारांनी प्रेरित होऊन मंडळाचे सर्व नवीन कलावंत काम करीत आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी दिली. सरचिटणीस नवीन तांबट यांनी आभारप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)