दातली शिवारात पाच वाहनांचा विचित्र अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:25 IST2018-08-01T00:25:26+5:302018-08-01T00:25:40+5:30
सिन्नर-शिर्डी महामार्गावर दातली शिवारात मंगळवारी पहाटे मालट्रक व आयशर टेम्पोची धडक झाली. त्यानंतर सकाळी पुन्हा याच ठिकाणी बस, दुचाकी व जीप यांच्यात विचित्र अपघात होऊन तालुक्यातील मीरगाव येथील युवक ठार झाला.

दातली शिवारात पाच वाहनांचा विचित्र अपघात
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर दातली शिवारात मंगळवारी पहाटे मालट्रक व आयशर टेम्पोची धडक झाली. त्यानंतर सकाळी पुन्हा याच ठिकाणी बस, दुचाकी व जीप यांच्यात विचित्र अपघात होऊन तालुक्यातील मीरगाव येथील युवक ठार झाला. सिन्नर-शिर्डी महामार्गावर दातली शिवारात मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास औरंगाबादकडून मुंबईकडे बिअर व कुरकुऱ्यांचे बॉक्स घेऊन जाणारा मालट्रक (एम. एच. ०४ जी. आर. ७५१८) व सिन्नरकडून शिर्डीकडे जाणारा आयशर टेम्पो (क्र. एम. एच. ०४ ई. पी. ४०९२) यांच्यात धडक झाली. सिन्नरकडून शिर्डीकडे जाणारी बस (क्र. एम. एच. ०७ सी. ९१५५), सिन्नरकडे जाणारी दुचाकी (क्र. एम. एच. १५ ए. पी. १९२९) व स्कॉर्पिओ जीप (क्र. एच. एच. १५ ए. पी. ४३६७) यांच्यात धडक झाली. यात दुचाकीस्वार मच्छिंद्र गोरख लोकनर (२१) हा गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत मृत्यू झाला होता. अपघातानंतर रस्त्यावर बिअरच्या बाटल्यांचा व कुरकुºयांचा खच पडला होता. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणारी वाहने याठिकाणी थांबत होती. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अपघात पाहण्यासाठी याठिकाणी वाहनांची गती कमी झाली होती.