द्राक्ष बागायतदारास पाच लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST2021-08-28T04:18:18+5:302021-08-28T04:18:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : दुडगाव येथील द्राक्ष बागायतदाराची खोट्या धनादेशाद्दारे पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या नऊ जणांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ...

द्राक्ष बागायतदारास पाच लाखांचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : दुडगाव येथील द्राक्ष बागायतदाराची खोट्या धनादेशाद्दारे पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या नऊ जणांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुडगाव शिवारात दि. २७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२१ या दरम्यान ४,८५,९१३ रुपयांची ९९१७ किलो द्राक्ष, पाडवा अग्रो सोल्युशन या कंपनीने खरेदी केली. त्या बदल्यात तेवढ्याच रकमेचा एस बँकेचा धनादेश द्राक्ष बागायतदारास दिला. बागायतदारास गरज पडल्यानंतर तो धनादेश घेऊन आपल्या खात्यावर जमा केला. तीन - चार दिवसांनी ‘खात्यावर पैसे शिल्लक नसल्या’चा शेरा घेऊनच धनादेश परत आला. दरम्यान, धनादेश घेऊन द्राक्ष खरेदी करणाऱ्याकडे गेला असता आज देतो, उद्या देतो, अशा थापा मारून अजूनही रक्कम दिली नाही. त्यामुळे शेवटी द्राक्ष बागायतदार सुरेश नामदेव भावले (५२, रा. पिंपळगाव बहुला) यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नऊ संशयितांविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. यातील संशयित पुढीलप्रमाणे अमित अरुण देशमुख (रा. शाजापूर, मध्य प्रदेश), भूषण दिलीप पवार (देवपूर, धुळे), विशाल मारुती विभुते (धुळे), अमोल अविनाश चव्हाण (कोथरुड, पुणे), सागर गजानन जगताप (बारामती, पुणे), संतोष तुकाराम बोराडे (थेरगाव, ता. निफाड), प्रशांत ज्ञानदेव भोसले (घोरपडी, पुणे), दीपक ज्ञानदेव भोसले (पुणे), सुर्याजीराजे भोसले (पुणे) या नऊ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून, सुर्याजीराजे भोसले यास अटक करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक राणी डफळ करीत आहेत.